मुश्रीफसाहेब, बांधकाम कामगारांना दम दिल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ, शिवाजी मगदूम यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 03:22 PM2024-11-16T15:22:46+5:302024-11-16T15:23:46+5:30
मतदार संघातील एजंटगिरी संपविण्यासाठी साथ द्या
मुरगूड : लाल बावटा संघटनेने जेव्हा पालकमंत्र्यांना २०१९ मध्ये पाठिंबा दिला तेंव्हा त्यांना दहा हत्तींचे बळ मिळाले, अशा शब्दात कौतुक केले होते. आज आम्ही त्यांच्या विरोधातील समरजित घाटगे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते सैरभैर होऊन कामगारांना लक्ष्य करत आहेत. मुश्रीफसाहेब, आमच्या कामगारांना दम दिल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा सज्जड इशारा लाल बावटा संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिला.
येथे लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, ऊस तोडणी संघटना, किसान सभा तसेच शालेय पोषण आहार संघटनेतर्फे समरजित घाटगे यांना विजयी करण्यासाठी शहरातून रॅली काढून त्यांना पाठिंबा दिला. मगदूम म्हणाले, पालकमंत्री यांनी मागच्या दाराने दुसऱ्या पक्षाशी युती केल्यामुळे त्यांच्यावर अत्यंत वाईट वेळ आली. मागील विधानसभा निवडणुकीत बांधकाम कामगारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र त्या बदल्यात त्यांनी संघटना संपविण्याचाच प्रयत्न केला.
समरजित घाटगे म्हणाले, कामगारांच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी एक प्रभावशाली विचारधारा असायला हवी अशीच धारणा स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांची होती. पण सध्या कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देताना लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जातात. एजंटगिरी आणि खंडणीखोर वृत्ती संपवण्यासाठी आम्हाला साथ द्या.
प्रा. सुभाष जाधव, प्रकाश कुंभार, डॉ. प्रवीण जाधव, संदीप सुतार, राज कांबळे यांची भाषणे झाली. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विक्रम खतकर यांनी स्वागत केले. दिनकर जाधव यांनी आभार मानले.
पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष
भरमा कांबळे म्हणाले, पालकमंत्र्यांना पाठिंबा देऊनही त्यांनी आमची संघटना बेदखल केली. मागच्या दाराने पळून जाऊन त्यांनी केवळ स्वतःचेच भले केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सर्वच कामगार संघटनांनी समरजित घाटगे यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे.