कस्तुरीची अंतिम एव्हरेस्ट चढाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:24 AM2021-05-22T04:24:05+5:302021-05-22T04:24:05+5:30
कोल्हापूर : रणरागिणी ताराराणीच्या कर्मभूमीत जन्मलेली गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिने शुक्रवारी रात्री दहा वाजता १७ हजार ५०० फूट उंचीवर ...
कोल्हापूर : रणरागिणी ताराराणीच्या कर्मभूमीत जन्मलेली गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिने शुक्रवारी रात्री दहा वाजता १७ हजार ५०० फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपासून एव्हरेस्ट चढाईला सुरुवात केली. हवामानाचा अंदाज घेत कस्तुरी बुधवारी एव्हरेस्ट सर करणार आहे. तिच्यासोबत अन्य १० गिर्यारोहकांचा गट आहे.
कस्तुरीने अंतिम ध्येयाकडे वाटचाल केली असून आज, शनिवारी दुपारी दोन वाजता कॅम्प क्रमांक २ येथे पोहोचेल. त्या ठिकाणी तिचा मुक्कम राहील. उद्या, रविवारचा दिवस विश्रांतीचा आहे. त्यानंतर साेमवारी (दि. २४) कॅम्प क्रमांक ३, तर मंगळवारी कॅम्प क्रमांक ४ येथे पोहोचेल. त्यानंतर बुधवारी सकाळी नऊ वाजता ती एव्हरेस्ट सर करील, असे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून बदललेले वातावरण, चक्रीवादळ, पाऊस यांमुळे या मोहिमेत थोडी अडचण निर्माण आली होती. बरेच दिवस वेदर विंडो ओपन होत नव्हती. दि. ११ व १२ मे रोजी पहिली वेदर विंडो ओपन झाली, त्यावेळी ६० ते ७० लोकांचे समिट झाले व पुढे १५ तारखेनंतर विंडो ओपन होऊन इतर लोकांचे समिट होत असते, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. पण बदलत्या हवामानामुळे तौक्ते चक्रीवादळ व बंगालच्या सागरात येणारे नवीन चक्रीवादळ यांचा परिणाम या वर्षी एव्हरेस्टच्या वेदर विंडो मिळण्यावर झाला. त्यामुळे वेदर विंडो मिळाल्याच नाहीत. हवामान तज्ज्ञदेखील गोंधळात पडले आहेत; कारण यापूर्वी असे कधी झाले नव्हते.
याचा परिणाम म्हणून बेस कॅम्प येथे २५० पेक्षा जास्त गिर्यारोहक वेदर विंडोची वाट पाहत आहेत. त्यातल्या त्यात दि. २५ व दि. २६ मे रोजी छोटी विंडो ओपन होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. वारा नेहमीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजीपूर्वक, हवामानाचा अंदाज घेत चढाई करावी लागणार आहे. दि. २९ मे रोजी ऑफिशिअली एव्हरेस्ट बंद होतो आहे. खुंबू आइस फॉलमध्ये बर्फ वितळायला सुरुवात होते. बर्फाचे कडे कोसळायला सुरुवात होते. या परिस्थितीत कस्तुरीला एव्हरेस्ट समिट करायचा आहे. कस्तुरी मानसिक व शारीरिकदृष्ट्या एकदम फिट आहे. हवामानाची साथ मिळाल्यास कस्तुरी नक्कीच एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा व करवीरचा भगवा ध्वज फडकावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.