जातिपातींच्या भिंतींपलीकडचे ‘मुस्लिम बोर्डिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:32 AM2019-09-02T00:32:58+5:302019-09-02T00:33:02+5:30
सचिन भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी अठरापगड जातींतील मुलांचा शिक्षणातून उद्धार व्हावा, या उदात्त ...
सचिन भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी अठरापगड जातींतील मुलांचा शिक्षणातून उद्धार व्हावा, या उदात्त हेतूने कोल्हापूर संस्थानात विविध जातिधर्मांतील मुलांकरिता स्वतंत्र वसतिगृहे बांधली. त्यात मुस्लिम समाजातील मुलेही शिक्षणात मागे पडू नयेत, म्हणून १५ नोव्हेंबर १९०६ रोजी ‘किंग्ज एडवर्ड मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली.
ब्रिटिशांच्या सत्तेचा अंमल असल्याने मुस्लिम समाजातील लोक पुढे येण्यास कचरत होते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याकडे पदसिद्ध अध्यक्षपद ठेवत, चेअरमनपद तत्कालीन स्टेट मिनिस्टर पी. सी. पाटील यांच्याकडे सोपविले. त्यात सात लोकांची गव्हर्निंग बॉडीही नेमली. त्या प्रथेप्रमाणे आजही छत्रपती घराण्यातील राजे पदसिद्ध अध्यक्ष, तर मुस्लिम समाजातील निवडून दिलेले चेअरमन व अन्य कार्यकारिणी कारभार पाहात आहे. राजर्षींनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे जातिपातींच्या पलीकडे जात हे बोर्डिंग सर्व समाजातील लोकांना आपलेच मानून त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात सहभागी होत मायेची फुंकर घालत आहे.
दसरा चौकात आल्यावर मुस्लिम बोर्डिंगकडे पाहिल्यानंतर कुठल्याही जातिधर्माचा नागरिक ‘ही एकाच समाजाची संस्था नसून ही आमचीही मातृसंस्थाच आहे,’ या नजरेने या संस्थेकडे पाहत आला आहे. तब्बल ११३ वर्षांचा हा वारसा ही संस्था नेटाने पार पाडीत आहे. कुठल्याही समाजाचे आंदोलन असो; त्याची सुरुवात दसरा चौकातून होते; कारण आंदोलनकर्त्यांना काय हवे - काय नको याची आस्थेने चौकशी या बोर्डिंगचे पदाधिकारी आवर्जून करतात. त्यामुळे समतेचे प्रतीक आणि वैचारिक केंद्र म्हणून हे बोर्डिंग नावारूपास आले आहे.
आरक्षणासाठी झालेला ‘मराठा क्रांती मोर्चा’ असो अथवा दलित समाजाचा मोर्चा अथवा लिंगायत समाजाचा आरक्षणाचा मोर्चा असो; त्या सर्वांना मुस्लिम बोर्डिंगने आपले भाऊच म्हणून नेटाने साथ दिली आहे.
दसरा चौकात १९०६ साली मराठा, लिंगायत, जैन, दैवज्ञ अशा एक ना अनेक अठरापगड जातींच्या मुलांचा शिक्षणातून विकास व्हावा, या उद्देशाने त्या काळी महाराजांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. आजच्या घडीला या मुस्लिम बोर्डिंगला ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ या नावानेही ओळखले जाते. यात शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक बळ देण्यासाठी मस्जिद, कब्रस्थान यांतून येणाऱ्या उत्पन्नातून दर्ग्याचा दिवाबत्ती खर्च वजा जाऊन उर्वरित खर्च शिक्षणावर करावा, असा त्या काळी राजर्षींनी फतवा काढला. बोर्डिंगची ऐतिहासिक इमारत त्या काळी ब्रिटिशांनी बांधली.
प्रथम ही इमारत चर्चसारखी होती. त्यानंतर तिला पवित्र मक्केतील कमानीसारखी आतील बाजूस व बाहेरील बाजूस कमान केली. दगडी बांधकाम असलेल्या या इमारतीचा ढाचा आजही डौलाने उभा आहे.
समाजाची इतर
समाजांशी नाळ घट्ट
मध्यंतरीच्या काळात गैरसमजातून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण झाली होती. यात मुस्लिम बांधवांचे मोठे नुकसान झाले. लोकांनी १४ लाख ३० हजारांची रोख व वस्तुस्वरूपात मदत केली. यात मुस्लिम समाजातील मदतीचा वाटा केवळ ८० हजारांचा होता. इतर सर्व समाजांतील लोकांचा वाटा मोठा होता. यासाठी ज्येष्ठ नेते दिवंगत गोविंदराव पानसरे, प्रा. एन. डी. पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
पूरपरिस्थितीतही साथ कायम
दसरा चौकातील बोर्डिंगच्या इमारतींमध्ये पूरग्रस्तांकरिता साहित्य जमा केले होते. यात वस्तूंचा हिशेब ठेवून त्यांचे योग्य वाटपही येथूनच झाले. आजही इतर समाजांतील अडलेल्या-नडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात लागल्यास या बोर्डिंगचे पदाधिकारी तत्परतेने धावतात.
आतापर्यंतचे पदाधिकारी
राजर्षी शाहू महाराज (संस्थापक-अध्यक्ष), तर तत्कालीन स्टेट मिनिस्टर पी. सी. पाटील, स्टेट प्राइम मिनिस्टर रावबहादूर दत्ताजीराव भोसले, एम. आर. बागवे, आदी मंडळींनी चेअरमनपद भूषविले. राजर्षींच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराज, आईसाहेब महाराज, छत्रपती शहाजीराजे, आदींनी पदसिद्ध अध्यक्षपद भूषविले आहे. सध्या शाहू छत्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. आतापर्यंत चेअरमनपदाची धुरा मौलवी नसीदशहा बागवान, स्वातंत्र्यसैनिक अॅड. ए. बी. मुल्ला, यामीन डंगरी, ए. के. तुरूप, हसनसाहब शेख, नजीरचाँद बागवान आणि गेली ३८ वर्षे एक वर्षाचा अपवाद वगळता गणी आजरेकर सांभाळत आहेत.
इमारतीच्या लाकूड बांधकामाचा उल्लेख
चार जुलै १९२२ रोजी संस्थेची बैठक जनाब दस्तगीर चॉँदसाहेब पटवेगार यांच्या घरातील माडीवर झाली. त्यात नारायणराव मेढे यांना बोर्डिंगच्या इमारतीच्या कामास लाकूड आणण्यासाठी पाच हजार रुपये दिले. मेढे यांनीही आपलीच संस्था म्हणून कामही केले.
त्या काळच्या उत्पन्नाचा मार्ग असा
मंडईतील मशिदीचे दुकानभाडे, बाबूजमाल दर्ग्यालगतचे दुकानभाडे, घुडणपीर आढ्याचे भाडे, बाराईमाम पिराचे जमिनींचे उत्पन्न, रुकडी पिराचे दर्ग्याकडील उत्पन्न मिळत होते. त्यातून दर्गा दिवाबत्ती व त्यातून काही उरले तर शिक्षणासाठी खर्चाची तरतूद होती. उर्वरित खर्चाकरिता हुजूर खजिन्यातून व अर्बन सोसायटीतून खर्च केला जात होता.