मुस्लिम समाजाने निभावले बंधुत्व
By admin | Published: October 16, 2016 12:06 AM2016-10-16T00:06:36+5:302016-10-16T00:06:36+5:30
खांद्याला खांदा लावून सहभाग : शेकडो कार्यकर्त्यांमुळे सुलभ नियोजन
कोल्हापूर : सकल मराठा समाजाने काढलेल्या मोर्चास तब्बल ८५ विविध जातिधर्मांच्या संस्था-संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पायांना पाने बांधून जे कष्ट घेतले, त्याला तोड नाही. आपल्या घरात एखादे शुभकार्य असल्यावर जसे सारे कुटुंब राबते, अगदी तसाच मुस्लिम समाज या मोर्चासाठी राबला. त्यामुळे मोर्चा संपवून घरी निघालेल्या प्रत्येकाच्या तोंडात या धाकट्या भावाबद्दल अत्यंत कृतज्ञतेची भावना होती. या मोर्चामुळे मराठा समाजाचे प्रश्न तर सुटतीलच; परंतु त्याच्या निमित्ताने मराठा-मुस्लिम समाजांमध्ये जो बंधुत्वाचा धागा एकदम मजबूत झाला, तो जास्त मोलाचा आहे.
कोल्हापूरची भूमी ही पुरोगामी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी तिची जडणघडणच त्या विचारांनी केली आहे. त्यामुळे सगळ्या जातिधर्मांचे लोक या मोर्चासाठी पुढे सरसावले. मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला त्यामागे सगळ्यांत महत्त्वाचे हे एक कारण आहे. कोल्हापूरच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे देशात आणि राज्यात कुठेही धार्मिक तेढ निर्माण होऊन जातीय दंगे झाले तरी कोल्हापूरने कधीही मुस्लिम बांधवांच्या घरावर दगड भिरकावला नाही. तणाव जरूर असे; परंतु अशा काही प्रसंगांवेळी दोन्ही समाजांतील लोक एकत्र येऊन जातीय सलोखा कसा चांगला राहील यासाठी पुढाकार घेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी दंगलीचे निमित्त होऊन गोरगरीब मुस्लिम बांधवांचे काही माथेफिरूंनी नुकसान केले. त्यावेळी त्यांना आधार द्यायला हेच कोल्हापूर पुढे आले होते आणि हे फक्त कोल्हापुरातच घडत आले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मोर्चा निघतोय म्हटल्यावर मुस्लिम बांधवांना सेवा करण्याची संधी मिळाली. या समाजाने या सेवेने सकल मराठा समाजाच्या हृदयात स्थान मिळविले आहे.
या सगळ्या कामात गणी आजरेकर, कादर मलबारी, इचलकरंजीचे सलीम कुरणे, सलीम अत्तार, तसेच वाईफ मुजावर, इरफान मुजावर, शकील नगारजी, हांजेखान सिंदी, हाजी इर्शाद टिनमेकर, जहॉँगीर मेस्त्री, नगरसेवक निलोफर मुजावर, आदींनी सहभाग घेतला.
४कोल्हापुरातील पार्किंगच्या ६५ ठिकाणी स्वत:चे स्वयंसेवक तैनात केले होते. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत मुस्लिम बांधव त्यासाठी चॉकपीठ टाकून नियोजन करीत होते व सकाळी सात वाजता तर ‘मराठा मावळा’ असा बिल्ला छातीवर लावून मैदानावर उतरले. हे नियोजन उत्तम झाल्यामुळेच मोर्चा संपल्यावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.
शिरोळ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी चंगेजखान पठाण, शेख यांच्या नेतृत्वाखाली भडंग, केळी आणि पाण्याचे वाटप केले.
इचलकरंजीतील हाजी कैस शौकत बागवान यांच्यासह कार्यकर्त्यांनी केळी, पाणी, सरबत यांचे वाटप केले.
मुस्लिम बोर्डिंगने पोलिस, मावळे, पत्रकारांसाठी आठ हजार नाष्ट्याची पाकिटे वाटप केली. पाण्याचे सव्वासात लाख पाऊच वाटप केले. त्यातील पाच लाख पाऊच हे वारणा साखर कारखान्याच्यावतीने माजी मंत्री विनय कोरे यांनी दिले होते.
लियाकत रंगरेज यांनी शिवाजी महाराजांचे चित्र असलेल्या दहा हजार पिशव्यांचे वाटप केले.
स्वच्छतेच्या कामातही मुस्लिम महिलांनी योगदान दिले.
बागवान गल्लीने सरबत वाटप केले.
कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीने चार ठिकाणी एक हजार किलो तांदळाचा पुलाव करून वाटला.