आरक्षणासाठी मुस्लिम संघटना रस्त्यावर
By Admin | Published: January 6, 2015 12:20 AM2015-01-06T00:20:36+5:302015-01-06T00:58:29+5:30
कोल्हापुरात मोर्चा : विद्यार्थी, युवकांचा मोठा सहभाग; विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी
कोल्हापूर : महाराष्ट्रातील मुस्लिम समाजास शिक्षण आणि सरकारी नोकरीत पाच टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण त्वरित मंजूर करावे, त्यासाठी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी कोल्हापूर शहर परिसरातील मुस्लिम युवक आज, सोमवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात विद्यार्थी तसेच युवकवर्ग सहभागी झाला होता.
मुस्लिम युवा संघटनेने मोर्चाचे आयोजन केले होते. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार वर्षा सिंघण यांना निवेदन दिले.
कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण पाहिजे आहे. डॉ. महंमदूर रहेमान समितीने मुस्लिमांना शिक्षण व नोकरीत आठ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. त्यामुळे महंमदूर रहेमान समितीने केलेल्या सर्व शिफारशी त्वरित अमलात आणाव्यात, अशी मागणी मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे.
मोर्चाचे नेतृत्व फिरोजखान उस्ताद, गणी आजरेकर, कादर मलबारी, मंजूरभाई बागवान, सलमान पाटील, सुहेल मणेर, अकबर शेख, मलिक बागवान, अमन बक्षू, बासिद सय्यद, एम. एम. म्हालदार, एस. एच. काझी, इजाज तांबोळी, एम. आर. बागवान,अमित जमादार आदींनी केले.