महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मुस्लिम महिलेची प्रसुती; मुलीचे नाव ठेवले महालक्ष्मी
By संदीप आडनाईक | Published: June 11, 2024 11:31 PM2024-06-11T23:31:25+5:302024-06-11T23:31:52+5:30
महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करताना एका मुस्लिम महिलेने धावत्या रेल्वेतच मुलीला जन्म दिला.
कोल्हापूर : महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करताना एका मुस्लिम महिलेने धावत्या रेल्वेतच मुलीला जन्म दिला. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या महालक्ष्मी एक्सप्रेसने गुरुवार दि. ६ जूनला लोणावळा स्थानक ओलांडताच या महिलेने एका मुलीला जन्म दिला. तिच्या पतीने या नवजात बालकाचे नावही गाडीच्या नावाने महालक्ष्मी असे ठेवले आहेत.
मीरा रोड येथील फातिमा खातून तय्यब ही ३१ वर्षीय महिला गरोदर होती. कोल्हापूरातून मुंबईकडे निघालेल्या या महिलेला लोणावळा स्थानकाजवळ कळा सुरु झाल्या आणि थोड्याच वेळात तिने मुलीला जन्म दिला. तिचे पती तय्यब यांनी या मुलीचे नामकरण ज्या रेल्वेतून ते प्रवास करत होते, त्या महालक्ष्मीवरुन दिले. या रेल्वेने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी या मुलीला पाहून रेल्वेत मुलीचा जन्म होणे, म्हणजे आमच्यासाठी देवीचे दर्शन घेण्यासाठी होते अशी प्रतिक्रिया दिली.
तय्यब म्हणाले, तिरुपती आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेतलेल्या रेल्वेतील कांही प्रवाशांनी मला सांगितले की, मला महालक्ष्मी रेल्वेत जन्म दिलेल्या माझ्या मुलीला पाहून त्यांना रेल्वेत देवीचे दर्शन झाले. म्हणून मी माझ्या मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवले. कर्जत गर्व्हमेंट रेल्वे पोलिसांनी वैद्यकीय मदत दिल्याबद्दल तय्यब यांनी त्यांचे आभार मानले. कोल्हापुरातून रात्री ८.४० वाजता सुटलेल्या या रेल्वेने इंजिनच्या कामामुळे लोणावळ्यादरम्यान दोन तासांचा थांबा घेतला होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माझ्या पत्नीला कळा येउ लागल्या.
तिने रेल्वेच्या स्वच्छतागृहाचा आसरा घेतला. कर्जत स्थानकावर या दांपत्याला वैद्यकीय मदत मिळाली. कर्जत रेल्वेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मुकेश डांगे म्हणाले, आम्ही कर्जत शासकीय रुग्णालयाला या ची कल्पना दिली होती. पारिचारिका शिवांगी साळुंखे आणि त्यांचे मदतनीस तत्काळ स्थानकावर पोहोचून वैद्यकीय मदत पोहाचवली. तीन दिवसानंतर महिला आणि बाळाला डिसचार्ज दिल्याचे रुग्णालयाच्या मेट्रन सविता पाटील यांनी दिली.