'आता थांबवाय लागतंय'... कोल्हापूरकरांच्या नव्या फलकानं वाढवली नेत्यांची धाकधूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 03:29 PM2019-09-16T15:29:59+5:302019-09-16T17:44:48+5:30
"आता थांबवाय लागतंय" अशा आशयाचे फलक सद्या कागल तालुक्यायील मुख्य रस्त्यावर लावल्याचे दिसते.नेमकं कोणाला थांबवाय लागतंय याची चर्चा मात्र तालुक्यात जोरदार सुरू आहे.
अनिल पाटील
मुरगूड : विधानसभेच्या तोंडावर राजकीय विद्यापीठ म्हणून परिचित असणाऱ्या कागल तालुक्यात अज्ञाताने लावलेल्या '"आता थांबवाय लागतंय" अशा आशयाच्या डिजिटल फलकाने खळबळ उडवून दिली आहे. फलक कागल तालुक्यायील मुख्य रस्त्यावर लावल्याचे दिसते. नेमकं कोणाला थांबवाय लागतंय याची चर्चा मात्र तालुक्यात जोरदार सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्याने राजकीय फिवर चढलेला पाहवयास मिळतो. पण कागल मध्येमात्र हा फिवर दरवेळीपेक्षा जास्तच दिसून येत आहे. आमदार हसन मुश्रीफ यांची तयारी जोरदार आहे. याबरोबरच समरजितसिंह घाटगे यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणच उमेदवार असल्याची हवा तयार केली आहे.
मुश्रीफ-समरजीत यांच्या मध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू असताना आता संजय घाटगे यांच्याकडूनही गटाच्या अस्तित्वासाठी आता नाही तर कधीच नाही अशी घोषणा केल्याने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापलेले पहावयास मिळते. सभा, मेळावे, विकासकामांचा उदघाटनाचा धडाका तर सुरू आहे, पण काही गटाकडून वेगळे फ़ंडे काढले जात आहेत.
कागल तालुक्यातील मुरगूडपासून कागलपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा असणाऱ्या मोठ-मोठ्या झाडावर तसेच मुरगुड -निपाणी रस्त्यावरही काही ठिकाणी '"आता थांबवाय लागतंय" असा आशय असणारे फलक दिसत आहेत. या फलकावर एका कोपऱ्यात इंग्रजी मध्ये रउ अशी अक्षरे सुद्धा आहेत. या डिजिटल फलकातील मजकूर नेमका कोणाला उद्देशून आहे याबाबत गोंधळाची स्थिती आहे. हे फलक शनिवारी रात्री अज्ञाताने लावले आहेत.
विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ कागलमध्ये गेले वीस वर्षे आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांची उमेदवारी आघाडीच्यावतीने अंतिम आहे. त्यांच्या विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे संजय घाटगे यांनी तुल्यबळ लढत दिली होती. यावेळीही शिवसेनेतून त्यांनी आपली लढत असणारच आहे अशी घोषणा केली आहे.
पण दोन ते तीन वर्षांपासून भाजपवासी झाल्यानंतर समरजीत घाटगे यांनीही विधान सभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार या अविर्भावात जोरदार मुसंडी मारली आहे. जर समरजीत याना उमेदवारी मिळाली तर येथून पुढे या उमेदवारीवर त्यांचाच हक्क राहील, मग आतापर्यंत अडचणीच्या काळात आम्ही लढत दिली, त्याचे काय असा प्रश्न संजय घाटगे गटाचे कार्यकर्ते उघड विचारत आहेत.त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत लढायचेच मग उमेदवारी संजय घाटगेना मिळो व त्यांचे पुत्र अमरीश घाटगेना असा निश्चय संजय घाटगे गटाने केला आहे. मुश्रीफांना वीस वर्षे आमदारकी दिली, आता त्यांनी थांबावे आणि आपल्या गटाला संधी मिळावी अशी समरजितसिंह घाटगे गटाकडून तयारी केली आहे.
समरजीत घाटगे गटाला थांबवायचे, मुश्रीफांना आता थांबवायचे की रस्ता दुरुस्तीसाठी होणारी झाडांची कत्तल थांबवायची यासाठी वृक्ष प्रेमीचा हा खटाटोप आहे, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. या पोस्टर बाजी गुलदस्त्यात आहे.पण एकंदरीतच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे हे मात्र नक्क्की!