मुतखडा- आयुर्वेद

By admin | Published: March 4, 2017 12:39 AM2017-03-04T00:39:35+5:302017-03-04T00:39:35+5:30

‘सर, वारंवार मुतखडे का होतात? मुतखडे सर्व एकाच प्रकारचे असतात का?’

Mutakhda- Ayurveda | मुतखडा- आयुर्वेद

मुतखडा- आयुर्वेद

Next

आज मुलं चिकित्सालयात आली त्यावेळी त्यांना वेगळंच दृश्य दिसलं. आमच्या कॉलनीत राहणारा पांडुरंग सकाळी लवकरच चिकित्सालयात आला आणि तो तपासणीच्या टेबलावर झोपलेला होता. मी त्याला काय झाले असावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांचाही एक रुग्ण अभ्यास झाला. पांडुरंगाला रात्रभर पोटात दुखत होतं. डाव्या कुशीतून खाली लघवीच्या जागेपर्यंत कळा येत होत्या. वारंवार लघवीला होत होते, तेही अस्सल कळांसहित. लघवी लालसर रंगाची होत होती. याचा अर्थ त्यातून रक्तस्रावही होत असावा. पांडुरंग दिवस उजडायची वाट पहात होता आणि त्यामुळे तो सकाळी लवकर चिकित्सालयात आला. ही सर्व मुतखड्याची लक्षणे होती. पूर्वीसुद्धा ४-५ वर्षांपूर्वी त्याला मुतखड्याचा त्रास होऊन गेला होता. त्याला तपासताना डावीकडे तो हातही लावू देत नव्हता. इतक्या वेदना होत्या. त्याला थोडं वेदनाशामक औषध देऊन झोपवलं.
‘सर, वारंवार मुतखडे का होतात? मुतखडे सर्व एकाच प्रकारचे असतात का?’ दिप्तीचा प्रश्न.‘सर्व मुतखडे एकाच प्रकारचे नसतात. आयुर्वेदाने त्यांचे वर्गीकरण थोडं वेगळं केलंय. ज्यात वेदना असह्य असतात. काही काळ वेदना थांबून परत सुरू होतात. मुतखडा बाहेर आल्यावर काळसर, काटे असल्यासारखा दिसतो तो मुतखडा वाताचा सांगितला आहे. पित्ताच्या मुतखड्यात आग, दाह जास्त असते. लघवी करताना आग जास्त होणे, रक्त पडते, मुतखडा बाहेर आल्यावर लालसर व साधारण बिब्याच्या आकाराचा दिसतो. कफाच्या मुतखड्यात वेदना तुलनेने कमी असतात. मूत्रप्रवृत्ती जास्त वेळा होते. खड्याचा रंग किंचित पांढरट, धुरकट असतो.’आजकाल एक्स-रे, सोनोग्राफी यामुळे मुतखड्याचे निदान अचूक व लवकर होते. त्याचे साहाय्य घेतलेच पाहिजे. तसेच एखादा मुतखडा बाहेर पडल्यावर त्याचे लॅबोरेटरीमध्ये पृथक्करण करून मिळते. याचा उपयोग मुतखडा ज्या पदार्थाने होतो, तो टाळण्यासाठी करता येतो. मुतखड्यावर उपचार करताना त्याच्या लक्षणाप्रमाणे केले तर जास्त उपयोगी पडतात. सरसकट एकच औषध व सर्व प्रकारच्या मुळव्याधीवर उपयोगी पडत नाही. जर वेदना जास्त असतील तर आधी थोडे स्नेहपान (सिध्द तेल किंवा तूप) पिण्यास देऊन मग मुतखडे बारीक करणारी औषधे वापरता येतात. मुतखडा झाल्यावर त्याचे उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त योग्य. तहानेच्या योग्य प्रमाणात पाणी पिणे, खाण्यात टोमॅटो, पालक, अळू असे पदार्थ कमी खाणे हे महत्त्वाचे. त्याचबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकदा लघवीची भावना झाली की लगेचच जाऊन येणे. मूत्राचा वेग रोखून धरला तर तो मुतखडाच काय, अनेक रोगांना निमंत्रण देतो. म्हणून ही काळजी घेणे महत्त्वाचे.
मुतखडा होऊ नये म्हणून आहारात कुळथाचा वापर फार फायदेशीर होतो. कोकणामध्ये कुळीथ वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. त्याची उसळ, पिठलं किंवा सार करून ते वापरता येतात. याशिवाय ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ती फळंही उपयोगी पडतात. अगदी काहीवेळा शरीरातील अंत:स्रावी ग्रंथींच्या बिघाडामुळे वारंवार मुतखडे होऊ शकतात, पण ते अगदी दुर्मीळ रुग्ण होत. त्यांना चिकित्सा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचीच गरज असते. एव्हाना पांडुरंगाला बरे वाटू लागले होते. त्याला तपासणी करण्यासाठी पाठविले व पुढील औषधे दिली.

Web Title: Mutakhda- Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.