माझ्या निर्णयांचा माजी पालकमंत्र्यांशी संबंध नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांनी केलेल्या आरोपांचे केले खंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 02:03 PM2023-08-08T14:03:02+5:302023-08-08T14:19:05+5:30
महालक्ष्मी मंदिरातील गरूड मंडपात यंदा गणेशोत्सवाला परवानगी नाही, कारण...
कोल्हापूर : मी घेत असलेल्या निर्णयांमध्ये माजी पालकमंत्र्यांची भूमिका नाही, ते मला कोणतीही सूचना करत नाहीत किंवा मी त्यांच्या सूचनेनुसार काम करत नाही, अशा शब्दात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी भाजपच्या माजी नगरसेवकांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. मी कसे काम करतो हे कोल्हापूरकरच अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या लोकप्रतिनिधींचा आरोपासंबंधी बोलताना ते म्हणाले, मी कशा पद्धतीने काम करत आहे हे कोल्हापूरकरांना चांगले माहीत आहे. त्यावर मी बोलण्यापेक्षा तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता. अंबाबाई मंदिर आवारातील गरूड मंडप ही हेरिटेज वास्तू असून सध्या ती धोकादायक स्थितीत आहे. फक्त लोखंडी सळ्यांच्या आधारावर ती तग धरलेली असल्याने तेथे धार्मिक विधींना, उपक्रमांना परवानगी दिलेली नाही. याबाबत पुजाऱ्यांनाही स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून न घेता दिलेल्या पर्यायी जागेत धार्मिक विधी करावेत.
राज्य पुरातत्व खात्याने नियुक्त केलेल्या आर्किटेक्टनी गरुड मंडपाचे इस्टिमेट दिले असून पावसाळा संपल्यानंतर काम सुरू होईल. गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड आणि नगारखाना या तीनही वास्तू संदर्भातील काम एकाचवेळी सुरू होईल. ते पूर्ण व्हायला किती दिवस लागतील, हे आत्ताच सांगता येणार नाही.
कोणाच्याही पोटावर पाय नाही...
अंबाबाई मंदिरालगतच्या वास्तू संपादनाबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, भूसंपादनात कोणाच्याही पोटावर पाय येऊ देणार नाही. अनेक नागरिकांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मोबदला किती मिळणार याबाबत लोकांना साशंकता असून माऊली लॉजच्या संपादनानंतर तीदेखील दूर होईल. मिळकतदार स्वत:हून जागा देण्यास तयार होतील याची खात्री आहे. लॉजच्या संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्याला मिळणारा मोबदला हे उत्तम उदाहरण असेल.
भक्त मंडळाचा गणपती पर्यायी जागेतच
श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे परंपरेनुसार गरूड मंडपात खजिन्यावरील मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी कसे करणार यावर जिल्हाधिकारी म्हणाले, कोणत्याही परिस्थिती गरूड मंडपात गणेशोत्सवाला परवानगी दिली जाणार नाही. तर भक्त मंडळाकडून अद्याप पर्यायी जागेची मागणी आलेली नाही.