माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा :मुश्रीफ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 02:26 PM2020-09-13T14:26:27+5:302020-09-13T14:32:52+5:30

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात मंगळवारपासून राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

My family, carry out my responsibility campaign effectively in the district: Mushrif | माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा :मुश्रीफ 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा :मुश्रीफ 

Next
ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा :मुश्रीफ गंभीर रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्यासाठी नियोजन करा

कोल्हापूर: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात मंगळवारपासून राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. योगेश साळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकरी डॉ. अशोक पोळ, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. आरती घोरपडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण् राज्यभर येत्या 15 सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेण्यात आली असून कोरोना नियंत्रणासाठी ही मोहीम उपयुक्त ठरेल असा विश्वास ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

मुश्रीफ म्हणाले, या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक शहरातील तसेच जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे कोरोना रूग्णांच्या संपर्कात आालेल्या संशयितांचा शोध घेवून त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान तर दुसऱ्या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे सांगून ग्रामविकासमंत्री  मुश्रीफ म्हणाले, एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत.

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने योग्य नियोजन करावे. या सर्वेतून एकही कुटूंब अथवा घर चुकू नये. याकामी सर्वांचे सहकार्य घ्या. मात्र नियुक्त केलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामात टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीतूनच केला उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना फोन

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वाढती कोरोना रूग्णसंख्या विचारात घेवून त्यांना ऑक्सिजनची उपलब्धता करावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून अधिकाधिक ऑक्सिजन कोल्हापूर जिल्ह्यातील रूग्णांसाठी पाठविण्याची विनंती केली. याचवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशीही दूरध्वनीवरून जिल्ह्यातील रूग्णांसाठी ऑक्सिजन, मनुष्यबळ या गोष्टिंची उपलब्धता व्हावी, अशी मागणी केली.

कोल्हापूरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने अवश्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात अशी सूचना ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी केली.

मुश्रीफ म्हणाले, शहरातील खासगी मोठ्या हॉस्पिटलना स्वत:च ऑक्सिजनची उपलब्धता करण्याबाबत प्रवृत्त करावे, काही कंपन्यांनाही ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना केली. शहरातील व्यापारी तसेच व्यावसायिकांची ॲन्टिजेन टेस्ट करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

शहर व ग्रामीण भागातील अत्यावस्थ रूग्णांना तात्काळ बेड मिळाला पाहिजे यासाठी प्रशासनाने अधिकाधिक बेड वाढविण्यावर भर द्यावा. तालुकास्तरीय कोव्हिड केअर सेंटरही अधिक परिपूर्ण आणि सक्षम करावीत. यासाठी आवश्यतेनुसार स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे, अशी सूचना करून ग्रामविकासमंत्री  मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला मागणीनुसार निधी उपलब्ध करून देणे. ऑक्सिजनचा पुरवठा आणि मनुष्यबळ याबाबतही शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.

कोरोनाबाबतची लोकांमधील भीती दूर करून त्यांना त्यांचे मनोधैर्य वाढवावे, अशी सूचना करून ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, सद्या कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यांची भीती दूर करून त्यांना आधार देण्यास आरोग्य विभागाने प्राधान्य द्यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याच्या कामास प्राधान्य द्यावे.

यावेळी जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या उपययोजनांची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली तर महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: My family, carry out my responsibility campaign effectively in the district: Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.