मायबाप सरकार आमचंसुद्धा हातावरच पोट हाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:22 AM2021-04-16T04:22:28+5:302021-04-16T04:22:28+5:30
कोल्हापूर : रिक्षा व्यावसायिक, फेरीवाले यांच्याप्रमाणे आमचं पोटही हातावरचंच आहे. त्यामुळे राज्य सरकारने फूल ना फुलाची पाकळी म्हणून लाॅकडाऊन ...
कोल्हापूर : रिक्षा व्यावसायिक, फेरीवाले यांच्याप्रमाणे आमचं पोटही हातावरचंच आहे. त्यामुळे राज्य सरकारने फूल ना फुलाची पाकळी म्हणून लाॅकडाऊन काळात तातडीचे अनुदान द्यावे, अशी आर्त हाक सलून कामगारांच्यावतीने महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सरकारला घातली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कोल्हापूरात ९५०० हून अधिक सलून दुकाने आहेत. या दुकानांमध्ये सरासरी दोन कामगार असून त्यांना झालेल्या कामापैकी काही टक्के मेहनताना पगार म्हणून दिला जातो. त्यातून ते आपला घर खर्च चालवितात. हा हिशोब रोजचा असल्यामुळे काम करेल त्याप्रमाणेच सलून मालक त्यांना हा मेहनताना अदा करीत असतात. मात्र, यंदाच्या लाॅकडाऊनची परिस्थिती काही वेगळीच आहे. गेल्या लाॅकडाऊन काळात तीन महिने हाताला काम नव्हते म्हणून अनेक सलून व्यावसायिकांनी कामगारांना अंगावर पैसे दिले. काहींनी अंगावर बँका, पतसंस्था, सोसायटी आणि सावकारांकडून नियमित काम सुरू होईल अशी भाबडी आशा मनी धरून कर्जे काढली. त्यानंतर काही महिने सुरळीत हफ्तेही गेले. पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागला. तशी मनात पुन्हा सलून दुकाने बंद होण्याची धास्ती वाढली आणि त्याप्रमाणे गुरुवारपासून लाॅकडाऊन झाले. त्यात राज्य सरकारने फेरीवाले, असंघटित कामगार, रिक्षा व्यावसायिकांना अनुदान देऊन दिलासा दिला. मात्र, यातून सलून व्यावसायिकांना डावलले. त्यामुळे आता घर खर्च आणि संसाराची गाडी कशी चालवायची असा यक्ष प्रश्न सलून कामगारांपुढे उभा राहिला आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने अशा सलून कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये, याकरीता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. दरम्यान, महामंडळातर्फे गुरुवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्यात आले.
चौकट
पार्लर व्यावसायिक महिलांनाही हवा मदतीचा हात
जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक अशा सुमारे दहा हजार महिला ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्यांचाही व्यवसाय कोलमडला आहे. अनेकांचे संसार या व्यवसायावरच चालतात. त्यामुळे पुरुष सलून कामगार, व्यावसायिकांप्रमाणे आमचासुद्धा अनुदानासाठी विचार करावा. अशी मागणी पार्लर व्यावसायिक महिलांकडून होत आहे.
कोट
सलून मालकांपेक्षा कामगारांचा विचार शासनाने करावा. त्यांनाही रिक्षाचालक, फेरीवाले, असंघटित कामगारांप्रमाणे हातावरचे पोट म्हणून अनुदान द्यावे. विशेष म्हणजे बारा बलुतेदारांपैकी आम्हीही एक आहोत.
सयाजी झुंजार, अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, कोल्हापूर