मेरी वेदर गैरव्यवस्थेच्या विळख्यात, प्रशासनाची अनास्था, मद्यपी, प्रेमीयुगुले यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:33 AM2019-03-26T11:33:24+5:302019-03-26T11:39:55+5:30
काँक्रीटच्या जंगलात बऱ्यापैकी राखलेल्या मोजक्या मैदानांपैकी एक म्हणजे मेरी वेदर मैदान होय. खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांचा येथे कायम राबता असतो; मात्र महापालिका प्रशासनाची अनास्था, मद्यपी, प्रेमीयुगुले यांचा विळखा अशा गैरव्यवस्थांच्या कोंडाळ्यामध्ये अडकलेल्या या मैदानामध्ये खेळणे, तसेच मॉर्निंग वॉक करणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे झाले आहे.
कोल्हापूर : काँक्रीटच्या जंगलात बऱ्यापैकी राखलेल्या मोजक्या मैदानांपैकी एक म्हणजे मेरी वेदर मैदान होय. खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांचा येथे कायम राबता असतो; मात्र महापालिका प्रशासनाची अनास्था, मद्यपी, प्रेमीयुगुले यांचा विळखा अशा गैरव्यवस्थांच्या कोंडाळ्यामध्ये अडकलेल्या या मैदानामध्ये खेळणे, तसेच मॉर्निंग वॉक करणे सर्वसामान्यांसाठी जिकिरीचे झाले आहे.
मेरी मैदानावर १२ महिनेही चार ते पाच क्रिकेट व फुटबॉलचे क्लब नियमित सरावासाठी येतात. आता तर शाळा-कॉलेजांना सुट्टी पडत असल्याने मोठ्या संख्येने खेळाडू येतात. या ठिकाणी मेरी वेदर क्लब, एन. सी. सी. क्लब, संडे-मंडे क्रिकेट क्लब, ओल्ड स्टार क्रिकेट क्लब यांसह १२ महिने फक्त फुटबॉल खेळणारेही काही ग्रुप आहेत. फक्त खेळायला न येता, महानगरपालिकेकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता, सामाजिक बांधीलकी जपत या क्लबनी या मैदानात विविध उपक्रम राबविल्यामुळे मैदानाचा चेहरा थोडा बदलला आहे.
येथे नियमित खेळायला येणाऱ्या क्लबने मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचा चेंडू चुकून वॉकिंगसाठी आलेल्या पादचाऱ्यांपैकी कोणाला लागू नये; यासाठी मैदानात एका बाजूला स्वखर्चाने लोखंडी जाळी उभी केली आहे; त्यामुळे खेळाडूंना मुक्तपणे खेळता येते. तसेच सिमेंटचे पीचही केले आहे.
खरे तर या मैदानावर हिरवळ उगविण्याची आवश्यकता आहे; परंतु मैदानाची देखभाल करण्यासाठी येथे कोणीही उपलब्ध नसल्याने तसे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तरी क्लबच्या वतीने मैदानासभोवती विविध प्रकारची १00 झाडे लावून ती जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र मैदानाच्या वारणा कॉलनीच्या बाजूला असलेला कोंडाळा दर १५ दिवसांनी पेटविला जात असल्याने तिथे सुमारे १० ते १५ फूट उंच वाढलेल्या झाडांना त्याची झळ बसत असल्यामुळे झाडे कोमेजतात. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने खेळाडूंमधून संताप व्यक्त केला जात आहे.
या ठिकाणी ओपन जिम बसविल्याने त्याचा फायदा अनेकांना होत आहे. तसेच ई-टॉयलेटची सोय करण्यात आली आहे; त्यामुळेही आबालवृद्धांची मोठी सोय झाली आहे. यासह येथे बॅडमिंटन कोर्ट असल्याने त्याचा अनेकांना फायदा होत आहे.
जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था
पहाटे पाच वाजल्यापासूनच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानात जॉगिंग ट्रॅकवरून चालणे, धावणे सुरू असते, तसेच कोठे योगसाधना, प्राणायाम करणारे नागरिकही आढळतात; मात्र ट्रॅकची दुरवस्था झाली असून, मैदानाची माती कधी-कधी या ट्रॅकवर येते. तसेच बॅडमिंटन कोर्टपासून ट्रॅक अर्धवट सोडल्याने मैदानातील खड्ड्यांतून त्यांना पुढे जावे लागते.
अनैतिक कृत्यांना आळा घालावा
मैदानाच्या परिसरात असलेले विजेचे खांब अनेकदा नादुरुस्त होतात. रात्री येथे अंधाराचे साम्राज्य असते. रात्रीच्या वेळी मद्यपी या मैदानाचा ताबा घेतात. मद्य पिऊन ते येथेच बाटल्या फेकतात. तळीरामांच्या या उपद्व्यापामुळे समस्येत आणखीनच भर पडते. मद्याच्या बाटल्या सर्रास मैदानात फेकून दिल्याने मुलांनाच, ज्येष्ठांनाच मैदानाची स्वच्छता करावी लागते. त्यातच हे मैदान आता प्रेमीयुगुलांचा लव्ह पॉइंटच होऊ लागले आहे. अशा अनैतिक कृत्यांना आळा घालण्याची मागणी खेळाडूंमधून होत आहे.
मैदानात या परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी नियमित कॉलेज चुकवून येथे दंगा करीत बसलेले असतात. त्यांचे टोळकेच बनत चालले आहे. येथे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. यासह मैदानात लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी महानगरपालिकेने सोय करावी.
- मिलिंद देसाई
विजेची सोय नसल्याने मैदानाचा ओपन बार म्हणून वापर केला जात आहे. सकाळी यामुळे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो; यासाठी लाईटची सोय करून स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी महानगरपालिकेच्या वतीने कर्मचारी नियुक्ती करावी.
- उद्योजक,
रोटेरियन संजय कदम