माझा लढा शिवाजी पेठेतील नागरिकांशी नाही
By Admin | Published: August 28, 2016 12:42 AM2016-08-28T00:42:03+5:302016-08-28T00:42:03+5:30
चंद्रदीप नरके : काहीजण जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असल्याची टीका
कोल्हापूर : माझा लढा हद्दवाढविरोधी आहे. शिवाजी पेठेतील नागरिकांशी नाही, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवाजी पेठ व १८ गावांतील ग्रामीण जनता आणि पर्यायाने माझ्यामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणारे लोक कोण आहेत, याचा शिवाजी पेठेतील जनतेने गांभीर्याने विचार करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात शुक्रवारी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीतर्फे मेळावा झाला होता. मेळाव्यात, शिवाजी पेठेत राहून पेठेतील जनतेबाबत चुकीची वक्तव्ये केल्याबद्दल आमदार चंद्रदीप नरके यांचा निषेध नोंदवीत त्यांच्यावर प्रखर टीका केली होती. तिला आमदार नरके यांनी संयमाने उत्तर दिले.
आमदार नरके म्हणाले, शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात आम्ही सनदशीर मार्गाने लढा सुरू ठेवला आहे. पण सध्या हद्दवाढीबाबत महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि हद्दवाढसमर्थक यांची माझ्याविरुद्ध निरर्थक आणि संदर्भहीन वैयक्तिक टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे. माझ्यासह आमच्या नरके घराण्याच्या चार पिढ्या शिवाजी पेठेत वास्तव्यास आहेत.
शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात, २० आॅगस्ट रोजी, शहराच्या लोकप्रतिनिधींनी ‘शिवाजी पेठ आली तर १८ गावांतील लोक वाहून जातील’ असे न शोभणारे वक्तव्य केले आहे. आजपर्यंत या लोकप्रतिनिधींनी व हद्दवाढसमर्थक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हीच १८ गावे शहरात समाविष्ट झाल्यानंतर शहराचा सर्वांगीण विकास होणार, असे वारंवार सांगितले आहे; पण या सभेला उपस्थित असणाऱ्या पेठेतील कोणाही नागरिक अथवा पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीचे वक्तव्य केलेले नाही. शिवाजी पेठ आणि १८ गावांतील ग्रामीण जनतेचे ऋणानुबंधाचे संबंध आहेत. त्यांच्यात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हे लोकप्रतिनिधी करीत असल्याची टीका नरके यांनी केली.
६० नाले गायब, नवे रुग्णालय, नाट्यगृह नाही
शहराच्या विकासाचा कारभार पाहता एकही नवे रुग्णालय अथवा नाट्यगृह बांधू शकला नाहीत, अशी टीका करीत नरके म्हणाले, नाल्यात भर टाकून ७६ नाल्यांपैकी १६ नाले आपण शिल्लक ठेवले.
ड्रेनेजची दुरवस्था, केरकचरा उठावाचा बोजवारा, उपनगरांची दुरवस्था याबाबत टीका करीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कारभाराला कंटाळून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचीही टीका त्यांनी केली.
प्रत्यक्षात महापालिकेतील नियोजनशून्य कारभारामुळेच शहराचे नाव व महानगरपालिका बदनाम झाली असल्याबाबत आत्मपरीक्षण करावे, असेही ते म्हणाले.
महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी
हद्दवाढीत समाविष्ट केलेल्या गावांना चार वर्षांनंतर टप्प्याटप्प्याने कर वाढविला जाणार असे महापालिकेचे पदाधिकारी सांगतात; पण त्याची श्वेतपत्रिका काढा. कारण शेतीवर आरक्षण टाकणार नाही म्हणून ते जाहीररीत्या बोलत असले तरी भविष्यातील विकास आराखड्यात जागांवर आरक्षण टाकण्याचा डाव या पदाधिकाऱ्यांचा दिसतो, असाही आरोप त्यांनी केला.