मित्राचा दांडक्याने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2015 01:04 AM2015-04-26T01:04:25+5:302015-04-26T01:04:25+5:30
म्हाळुंगे तर्फ बोरगावची घटना : मोबाईल न दिल्याने कृत्य; आरोपीस अटक
पन्हाळा : म्हाळुंगे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथे मोबाईलवरून फोन करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाचा खून केल्याची घटना घडली. कृष्णात बापू पाटील असे खून झालेल्याचे नाव आहे, तर खूनप्रकरणी त्याचा मित्र शरद कांबळे यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, म्हाळुंगे तर्फ बोरगाव गावातील कृष्णात बापू पाटील व शरद दिनकर कांबळे हे दोघे मित्र होते. हे दोघे शुक्रवारी सायंकाळी गावाजवळील हॉटेलमध्ये जेवावयास गेले होते. जेवण करून गावच्या तालमीच्या कट्ट्यावर बसले होते. यातील शरद याच्या शेतात मशागत करण्याकरिता औत पाहिजे होते. त्याकरिता शरदने कृष्णात यांना जवळच्या महाडिकवाडी गावातील औतवाल्यास फोन करण्याची विनंती केली. मात्र, कृष्णात यांनी आपल्या फोनवर बॅलन्स नसल्याचे सांगितले. त्याचा शरदला राग आला. जवळच पडलेला लाकडी दांडका त्याने कृष्णात यांच्या डोक्यात घातला. कृष्णात त्याच अवस्थेत घरी गेला. त्याच्या जखमेतून रक्तस्राव झाल्याने सकाळी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले, पण उपचारापूर्वीच तो मृत झाला.
आरोपी शरद कांबळे हा घरी झोपला होता. त्याला सकाळी अटक करण्यात आली. दोघांनी मद्यपान केले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी किसन गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)