रक्ताच्या नात्यापेक्षा मायेचे नातेच सार्थ! मानस कन्येचा थाटात विवाह; कोल्हापुरातील तावडे कुटुंबीयांंचा मोठेपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:28 PM2018-05-05T23:28:33+5:302018-05-05T23:28:33+5:30
कोल्हापूर : रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेळा मायेने जोडलेली नातीच किती मौल्यवान असतात, याची प्रचिती शनिवारी येथे एका लग्नसमारंभात आली. लहानपणीच निराधार झालेल्या रेश्मा दळवी हिचे येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना आणि चंद्रकांत तावडे यांनी
कोल्हापूर : रक्ताच्या नात्यापेक्षा काही वेळा मायेने जोडलेली नातीच किती मौल्यवान असतात, याची प्रचिती शनिवारी येथे एका लग्नसमारंभात आली. लहानपणीच निराधार झालेल्या रेश्मा दळवी हिचे येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना आणि चंद्रकांत तावडे यांनी अत्यंत थाटामाटात लग्न करून दिले. या मानलेल्या मुलीला सासरी पाठविताना त्यांचा ऊर भरून आला.
रेश्मा राजेंद्रनगर झोपडपट्टीत जन्मलेली. घरी अठराविश्वे दारिद्र्य. एका दुर्घटनेत आईवडिलांसह बहीणही भाजून मृत्युमुखी पडल्या. रेश्मा त्यावेळी अवघी तीन वर्षांची होती. ती व तिची बहीणच कुटुंबात उरल्या. निराधार झालेल्या या दोन्ही बहिणींना कल्पना तावडे यांनी मायेचा आधार दिला. त्यांना आपल्या घरी आणले.
झोपडपट्टीतील मुले शिकली, संस्कारित झाली पाहिजेत, यासाठी गेली अनेक वर्षे राजेंद्रनगर झोपडपट्टीत जाऊन ज्ञानदीप विद्यामंदिराच्या रूपाने ज्ञानाचा दिवा लावणाचे काम कल्पना तावडे यांनी केले आहे. त्यांनी या दोन्ही मुलींना शिकविले. त्यातील रेश्माने तावडे कुटुंबाला खूपच लळा लावला. रेश्माला आपलीच मुलगी म्हणून वाढविले. तिचे बारावीपर्यंत शिक्षण केले. घरात लग्नाचा विचार सुरू झाला तेव्हा ‘तुला पसंत असेल त्याच्याशी आपण लग्न करू,’ इतके स्वातंत्र्यही दिले. गोसावीवाडी (ता. कºहाड) येथील सुभाष हरिबा पवार यांचा मुलगा अजित यांच्याशी तिचे लग्न ठरले.
रेश्माला लग्नात नटण्याची भारी हौस होती. तिला नववधूच्या शालूबद्दल, हिरव्या चुड्याबद्दल केवढं अप्रुप! मग हा आनंद तिला द्यायचा म्हणून तावडे कुटुंबीयांनी लग्नाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. अतिशय थाटामाटात तिचे लग्न लावून दिले. संसारसेटपासून दागिन्यांपर्यंत सगळी हौसमौज केली. तावडे दाम्पत्यासह त्यांचा मुलगा गजेंद्र, सून दीपा, मुलगी गीता हांडे यांच्यासह ज्ञानदीप विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सर्जेराव चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी लग्नाची व्यवस्था आनंदाने केली.
कोल्हापुरात शनिवारी कल्पना व चंद्रकांत तावडे यांची मानस कन्या रेश्मा हिचा विवाह हेळगाव-गोसावीवाडी (ता. कºहाड) येथील अजित पवार यांच्याशी अत्यंत थाटामाटात झाला.