माझी भूमिका ‘स्ट्रिक्ट फादर’चीच!
By admin | Published: August 4, 2016 12:28 AM2016-08-04T00:28:33+5:302016-08-04T01:28:35+5:30
विश्वास नांगरे-पाटील : गुंडांचा ‘कार्यक्रम’ करणार; नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळणार
सांगली : पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे, यासाठी मी सदैव आग्रही आहे. पोलिस कर्मचाऱ्यांवरील ताण-तणावामुळे काहीवेळा वादविवाद होत असतात. तेही माझे बांधवच आहेत. हे वातावरण बदलण्यासाठी काहीकाळ लागेल. आपण ‘स्ट्रिक्ट फादर’ची भूमिका निभावणार असून, ‘स्पेट मदर’ होणार नाही, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केले.
विश्वास नांगरे-पाटील गेले दोन दिवस सांगली दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागरिकांत पोलिसांबद्दल विश्वासार्हता निर्माण करण्यावर आपला भर आहे. तक्रारदार पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याला कशी वागणूक मिळते, यावर आमचे लक्ष असेल. त्यासाठी नियंत्रण कक्षात स्वतंत्र यंत्रणा उभी करणार आहोत. दिवसभरात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल होणाऱ्या तक्रारींची माहिती घेऊन संबंधित तक्रारदाराला नियंत्रण कक्षातून दूरध्वनी जाईल. त्याला पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याची तक्रार दाखल करून घेताना त्रास दिला का? पैशाची मागणी झाली का? तक्रारीची प्रत मिळाली का? असे तीन प्रश्न विचारले जातील.
यापुढील काळात गुंडांवर पोलिसांची दहशत बसलीच पाहिजे, अशा पध्दतीने पोलिसिंंग झाले पाहिजे आणि तेच आम्ही यापुढील काळात करणार आहोत. जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखायची असेल तर, समाजविघातक कारवाई करणारे आणि गुंडागर्दी करणाऱ्यांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव तातडीने तयार केले गेले पाहिजेत. या जिल्ह्यातून जवळपास ३०० जणांना हद्दपार केले पाहिजे आणि तसे प्रस्ताव तयार करावेत, असे आदेश त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. अनेक प्रकरणांत खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. त्याविरोधातही खंबीरपणे धोरण राबविणार आहोत. (प्रतिनिधी)
हायवे बीट निर्माण करणार...
महामार्गावर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्याशिवाय दुभाजक फोडणे, विनाहेल्मेट प्रवास, ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह असे प्रकार सर्रास होतात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी हायवे बीट हे स्वतंत्र पथकच तयार करणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.