राजू शेट्टींच्या चुकांमुळेच माझा विजय : धैर्यशील माने, कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:31 AM2019-06-05T11:31:58+5:302019-06-05T11:38:59+5:30
राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी चुका केल्यामुळेच माझा विजय झाला, अशी कबुली नूतन खासदार धैर्यशील माने यांनी दिली. त्यांच्या चुकांमुळेच मी खासदार झालो असलो तरी पुढील पाच वर्षांनंतर माझ्या कामाच्या जिवावरच मी खासदार म्हणून पुन्हा विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माध्यमांनी पाठीशी उभे राहावे, मित्रत्वाच्या नात्याने चुका दाखवून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे मंगळवारी नूतन खासदार धैर्यशील माने यांचा फेटा बांधून व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार माने यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना राजकीय वाटचालही विशद केली. ते म्हणाले, स्व. खासदार बाळासाहेब माने यांच्याप्रमाणेच नैतिकतेचे व्रत घेऊन राजकारणात आलो, ते आयुष्यभर जपणार आहे. याच जिवावर मी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत राजकीय प्रवास केला आहे.
नकारात्मक वातावरण असतानाही, आर्थिक बळ नसतानाही, शंका-कुशंकांच्या वातावरणातही बहुजनांच्या जिवावर संसदेत पाय ठेवण्याची संधी मला मिळाली. राजकारण पाच वर्षांनंतर करणार. आता समाजकारणाचा अध्याय सुरू झाला आहे. सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच शाहूंच्या या जिल्ह्याचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. पुढील दोन वर्षे मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार आहे. मागील खासदारांनी सुरू केलेली कोणतीही कामे बंद करणार नाही, आकसाने कधी वागणार नाही. जुन्या-नव्यांचा मेळ घालतच माझी वाटचाल सुरू राहील. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, सचिव बाळासाहेब पाटील, विजय पोवार उपस्थित होते.
‘संसदरत्न’ दिलं तरी नको!
‘संसदरत्न’ पुरस्काराविषयी छेडले असता खासदार माने यांनी ‘संसदरत्न दिलं तरी नको रे बाबा...’ असे म्हणत जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा पुरस्कार असल्याचे स्पष्ट केले. स्पर्धेत धावण्याची माझी इच्छा नाही; याउलट लोकांना न्याय देणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.