अनिकेतला मारण्याचे ‘रहस्य’ पडद्याआडच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:46 AM2017-11-27T00:46:32+5:302017-11-27T00:49:27+5:30
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोलिस कोठडीतील मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू होऊन रविवारी २१ दिवस पूर्ण झाले. या प्रकरणाने सांगली पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. ‘सीआयडी’ने पंधरा दिवस तपास केला, पण अजूनही अनिकेतच्या खुनामागील ‘रहस्य’ उलगडलेले नाही. ‘अश्लील सीडी’ प्रकरणातून पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेने ‘सुपारी’ घेऊन अनिकेतचा खून केल्याचा आरोप झाला. मात्र त्यादृष्टीने सीआयडीकडे अजूनही कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे अनिकेतच्या खुनामागील कारणाचे गूढ वाढले आहे.
कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास लुबाडल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. दोन हजाराची रोकड व सहा हजाराचा मोबाईल लंपास केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. दोघांचाही हा पहिलाच गुन्हा होता. अनिकेतच्या बाबतीत मात्र हा पहिलाच गुन्हा शेवटचा ठरला. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व जीव जाईपर्यंत मारहाण केली. किरकोळ चोरी, तीही दोघांनी केली होती. पण नेमके अनिकेतलाच ‘टार्गेट’ करुन त्याला जिवानिशी का मारले?, हा त्याच्या कुटुंबियांचा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. सीआयडीच्या पंधरा दिवसांच्या तपासातूनही या प्रश्नाचे उत्तर कोथळे कुटुंबियांना मिळालेले नाही.
हरभट रस्त्यावरील लकी बॅग्ज दुकानात अनिकेत कामाला होता. दुकानाचा मालक नीलेश खत्री याच्याशी पगारावरुन त्याचा वाद झाला. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत आले. पण ते सामोपचाराने मिटल्याने अनिकेतविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेनंतर अवघ्या दोनच दिवसात अनिकेतविरुद्ध लूटमारीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातच अटक होऊन त्याला जीव गमवावा लागला. कामटेने ‘सुपारी’ घेऊन अनिकेतचा खून केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. अश्लील सीडी प्रकरणही यामागे असल्याचा आरोप त्यांनी केला. तशी लेखी तक्रारही सीआयडीकडे केली. परंतु गेल्या पंधरा दिवसांच्या तपासात कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.
‘डीएनए’ अहवाल : महत्त्वाचा
आंबोलीतील जंगलात अर्धवट जळालेला अनिकेतचा मृतदेह सापडला; पण तो अनिकेतचा आहे का, हे शास्त्रीयदृष्ट्या न्यायालयात सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी मृतदेहाची ‘डीएनए’ तपासणी केली जात आहे. त्याचा अहवाल तातडीने देण्याची मागणी केली आहे. या अहवालावरच तपासाची मदार आहे. सीआयडीने गेल्या पंधरा दिवसांत तपास केला. अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक गीता बागवडे व त्यांच्या सहकाºयांनी कामटेसह सहाजणांविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी धडपड केली. यात त्यांना यशही आले आहे. पोलिस ठाण्यात ड्युटीवर असलेले पोलिस, अमोल भंडारे यांचे जबाब नोंदवून घेतले. प्रत्यक्षदर्शी व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून येत्या ९० दिवसांत कामटेसह सहाजणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे नियोजन केले आहे.
राज्यातील दिग्गज नेत्यांची हजेरी
पोलिस कोठडीतील मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या; पण आरोपीचा मृतदेह जाळून टाकण्याची देशातील पहिली घटना सांगलीत घडल्याने प्रचंड खळबळ माजली. पालकमंत्री सुभाष देशमुख, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार पतंगराव कदम, जयंत पाटील, सुमनताई पाटील, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सांगली दौरा करून कोथळे कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी, सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक संजय वर्मा, संजयकुमार सिंघल, पुणे विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील रामानंद यांना सांगलीत येऊन तपासाबाबत मार्गदर्शन करावे लागले.