‘एन. डी.’ना मार्गदर्शन करणे आवडते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:24+5:302021-09-06T04:27:24+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील हे जातीवंत शिक्षक, प्राध्यापक राहिले. त्यांना मार्गदर्शन करणे, शिक्षण देणे खूप ...
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील हे जातीवंत शिक्षक, प्राध्यापक राहिले. त्यांना मार्गदर्शन करणे, शिक्षण देणे खूप आवडते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागीय सल्लागार समिती सदस्य सरोज पाटील (माई) यांनी रविवारी केले.
येथील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा त्यांच्या निवासस्थानी शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पत्नी सरोज पाटील बोलत होत्या. त्या म्हणाल्या, एन. डी. यांचा मूळ पिंड शिक्षकी आणि प्राध्यापकी पेशाचा आहे. त्यांचे वाचन अफाट आहे. ते नेहमी विविध विषयांवर मार्गदर्शन करत राहिले. त्यांना हे काम प्रचंड आवडते. वयोमानानुसार ते आता थकले असले तरी आवाज खणखणीत आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव जगदाळे म्हणाले, प्रा. एन. डी. पाटील हे महाराष्ट्राचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक काम उत्तुंग आहे. यामुळे शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे कार्याध्यक्ष रामेश्वर पतकी म्हणाले, प्रा. एन. डी. पाटील सरांनी लाखो विद्यार्थी घडवले आहेत. सुजाण नागरिक घडविण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक किसनराव कल्याणकर, शिवाजीराव ढवाणा, सतीश पोवार, अंकुश देशपांडे, संग्राम जाधव आदी उपस्थित होते.
फोटो : ०५०९२०२१-कोल- एन. डी. पाटील सत्कार
कोल्हापुरातील रूईकर कॉलनीतील घरात ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचा सत्कार रविवारी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी किसनराव कल्याणकर, रामेश्वर पतकी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
छाया= नसीर अत्तार