‘एन. डी. पाटील-सरोज माई’ समाजकार्याचा आदर्श दीपस्तंभ : श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:34 AM2020-12-30T04:34:25+5:302020-12-30T04:34:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी अविरतपणे कार्यरत असणारे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि त्यांना ...

‘N. D. Patil-Saroj Mai's ideal beacon of social work: Srinivas Patil | ‘एन. डी. पाटील-सरोज माई’ समाजकार्याचा आदर्श दीपस्तंभ : श्रीनिवास पाटील

‘एन. डी. पाटील-सरोज माई’ समाजकार्याचा आदर्श दीपस्तंभ : श्रीनिवास पाटील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी अविरतपणे कार्यरत असणारे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि त्यांना कृतिशील साथ देणाऱ्या सरोजमाई हे दाम्पत्य समाजकार्याचा आदर्श दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी मंगळवारी येथे केले.

येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये ‘मी कास्ट फ्री... मुव्हमेंट’ या संस्थेच्यावतीने आयोजित ‘शरद-प्रतिभा’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष माधवराव मोहिते होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. पाटील आणि सरोज पाटील यांना खासदार पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, संविधानाची प्रत, सत्यशोधक पोशाख आणि रोख ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. खासदार पाटील म्हणाले, समाजातील वंचितांना बळ देणाऱ्या एन. डी. पाटील, सरोजमाई, शरद पवार आणि प्रतिभाताई यांच्या कर्तृत्वाचा, समाजकार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून झाला आहे. माझ्या जवळच्या आणि कर्तृत्ववान माणसांचा सन्मान झाल्याचा खूप आनंद होत आहे. महाविद्यालयीन जीवन, राजकीय, सामाजिक जीवनातील पवार कुटुंबीयांसमवेतच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. सरोज पाटील म्हणाल्या, एन. डी. पाटील आणि शरद पवार यांच्यासभोवती नेहमी कार्यकर्त्यांचा गराडा असतो. त्यांचे मार्ग, कार्यपद्धती वेगळी असली, तरी समाजसेवेचा उद्देश एकच आहे. त्यांच्या तुलनेत माझे काम काहीच नाही. प्रतिभा पवार यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी, हरहुन्नरी आहे. त्यांनी पवार कुटुंबाला वटवृक्षासारखा आधार दिला. शरद आणि प्रतिभा यांच्या नावाने असलेला हा पुरस्कार आम्हाला समाजकार्याची ऊर्जा देईल.

---------------------------------------

पुरस्काराची रक्कम केली परत

या पुरस्काराच्या रकमेमध्ये स्वत:जवळील पाच हजार घालून सरोज पाटील यांनी ५५ हजार रुपये ‘मी कास्ट फ्री... मूव्हमेंट’ला परत केले. प्रत्येक महिला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात अव्वल असते. नेत्यांच्या यशात महिलांचे मोठे योगदान असते; पण त्यांचे कार्य प्रकाशझोतात येत नाही. महिलांच्या कार्याचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करण्याचा प्रशांत गेडाम यांचा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे सरोज पाटील यांनी सांगितले.

------------------------------------------

फोटो : २९ कोल्हापूर १०

कोल्हापुरात मंगळवारी ‘मी कास्ट फ्री... मूव्हमेंट’ या संस्थेच्यावतीने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि सरोज (माई) पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी ‘शरद-प्रतिभा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रशांत गेडाम, सर्जेराव वाघमारे, संगीता पाटील, प्रशांत पाटील, प्रसाद कुलकर्णी, जे. एफ. पाटील आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: ‘N. D. Patil-Saroj Mai's ideal beacon of social work: Srinivas Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.