एन. डी. पाटील यांचे श्वेता जुमानी यांना खुले आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:02 PM2020-02-10T12:02:54+5:302020-02-10T12:10:36+5:30

अंकशास्त्राने प्रश्न सुटतात, भरभराट होते, नि:संतानांना संतती प्राप्त होते, हे दावे बंद खोलीत न करता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांसमोर थेट खुल्या चर्चेला येऊन सिद्ध करा. सिद्ध केले तर २१ लाखांचे बक्षीस घेऊन जा, असे खुले आव्हान प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी श्वेता जुमानी यांना दिले आहे.

N. D. Patil's open challenge to Shweta Jumani | एन. डी. पाटील यांचे श्वेता जुमानी यांना खुले आव्हान

एन. डी. पाटील यांचे श्वेता जुमानी यांना खुले आव्हान

Next
ठळक मुद्देएन. डी. पाटील यांचे श्वेता जुमानी यांना खुले आव्हानजिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांसमोर सिद्ध करून दाखवा!

कोल्हापूर : अंकशास्त्राने प्रश्न सुटतात, भरभराट होते, नि:संतानांना संतती प्राप्त होते, हे दावे बंद खोलीत न करता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांसमोर थेट खुल्या चर्चेला येऊन सिद्ध करा. सिद्ध केले तर २१ लाखांचे बक्षीस घेऊन जा, असे खुले आव्हान प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी श्वेता जुमानी यांना दिले आहे.

अंकशास्त्राच्या अभ्यासक श्वेता जुमानी यांच्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने विरोध दर्शवल्यानंतर जुमानी यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘अंनिस’ने रुईकर कॉलनी येथील एन. डी. पाटील यांच्या घरी बैठक घेऊन आपली भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशाही स्पष्ट केली.

यावेळी एन. डी. पाटील म्हणाले, अंकशास्त्र हे थोतांड आहे, विज्ञानाने सिद्ध केले तरी खुळे लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत. समाजातील जाणत्या लोकांनी दुर्लक्ष केल्यानेच अशा लोकांचे फावले आहे. लोकांच्या अज्ञान आणि अंधश्रद्धेवर पोसलेल्या या बाजारपेठेमुळे खिसा रिकामा होऊ नये, याच भावनेतून अंनिसने त्यांची भोंदूगिरी उघड करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

कोणताही शास्त्रीय आधार नसताना अशा प्रकारचे दावे करणे हीच मुळी मोठी फसवणूक असल्याने जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत, पण प्रशासन काहीच करीत नसल्याने आम्हाला रस्त्यावर उतरून प्रबोधनाची भूमिका घ्यावी लागत आहे.

दावा सिद्ध करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा!

आता जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांनी यावर बैठक लावावी, मी स्वत: आणि आमचे ‘अंनिस’चे कार्यकर्ते त्याकरिता येतील. तेथे जुमानीनींही यावे, आपले दावे सप्रमाण सिद्ध करून दाखवावेत, त्यांनी ते सिद्ध केल्यास आम्ही जाहीर केलेले २१ लाखांचे बक्षीस लगेच देऊ, हे आम्ही बाँडपेपरवरही लिहून देण्यास तयार आहोत. पण जर का त्या ते सिद्ध करू शकल्या नाहीत, तर मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असेही एन. डी. पाटील यांनी ठणकावले.

यावेळी सुजात म्हेत्रे, प्रकाश भोईटे, सुनील स्वामी, अनिल चव्हाण, विनायक चव्हाण, दिलीप कांबळे, गीता हासूरकर, अनिल शेलार, नियाज अत्तार, स्वाती कृष्णात, बाबूराव कदम, अतुल दिघे हे प्रमुख उपस्थित होते.

हा तर तानाजी मालुसरे यांचा अपमानच

‘तानाजी’ हा चित्रपट महान योद्ध्याच्या देदीप्यमान इतिहासामुळे आणि कलाकारांच्या अभिनय आणि चांगल्या निर्मितीमुळे गाजत आहे. त्यात ‘तानाजी’ ऐवजी एक शब्द वाढवून तो ‘तान्हाजी’ केल्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचा जुमानी यांनी केलेला युक्तिवाद म्हणजे शिवाजी महाराजांच्या तानाजी मालुसरे या महान योद्ध्याचा अपमान आहे, असे अंनिसचे जिल्हाध्यक्ष संजय बनसोडे यांनी सांगितले.

मग जुमानी यांनीच सर्व प्रश्न सोडवावेत

अंकशास्त्राप्रमाणे नावात स्पेलिंग बदल केल्यास यश मिळते, कामे होतात, असा दावा जुमानी करत असतील तर सर्वांचेच स्पेलिंग बदलवून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचेही प्रश्न सोडवून दाखवावेत, नि:संतान असणाऱ्यांना कशी काय संतती प्राप्त होणार हे देखील दाखवून द्या, असे अंनिसच्या कार्यकर्त्या सीमा पाटील व डॉक्टर जयश्री चव्हाण, प्रा. प. रा. आरडे, डॉ. किरण भिंगार्डे यांनी आव्हान दिले.
 

 

Web Title: N. D. Patil's open challenge to Shweta Jumani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.