के. एन. गणेश : जी. डी. यादव यांना ‘डी.

By admin | Published: April 13, 2016 11:50 PM2016-04-13T23:50:40+5:302016-04-13T23:56:11+5:30

एस्सी.’, भय्यू महाराज ‘डी.लिट’ने सन्मानित; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ विज्ञानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक

Of N. Ganesh: Yes. D. Yadav to 'D' | के. एन. गणेश : जी. डी. यादव यांना ‘डी.

के. एन. गणेश : जी. डी. यादव यांना ‘डी.

Next

कोल्हापूर : जगातील विविध देशांनी विज्ञानाची कास धरून आर्थिक सक्षमता प्राप्त केली आहे. त्यामुळे भारताला आर्थिक सक्षमतेसह महासत्ता होण्यासाठी विज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स् एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्चचे (आयआयएसईआर) संचालक प्रा. डॉ. के. एन. गणेश यांनी बुधवारी येथे केले.
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कदमवाडीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, तर बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, कुलगुरू डॉ. एस. एच. पवार, डी. वाय. पाटील विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील प्रमुख उपस्थित होते.
मुंबईतील रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांना ‘आयआयएसईआर’चे संचालक प्रा. डॉ. के. एन.गणेश यांच्या हस्ते सन्मानदर्शक डॉक्टर आॅफ सायन्स् (डी.एस्सी) पदवी, तर इंदोर येथील श्री दत्त सद्गुरू धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टचे संस्थापक उदयसिंग देशमुख ऊर्फ भय्यू महाराज यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. भटकर यांच्या हस्ते सन्मानदर्शक डॉक्टर आॅफ लेटर्स (डी.लिट) पदवी देण्यात आली. उत्साही वातावरणात दीक्षान्त समारंभ पार पडला. यंदा २१० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. यादव म्हणाले, सरकार कोणतेही असो; पण पुढील दोन वर्षांत देशाच्या दरडोई उत्पन्नात ९.५ टक्क््यांची वाढ होणे आवश्यक आहे. यात विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे. सध्याच्या स्थितीत इंटरनेट हे द्रोणाचार्य बनले असून, त्याकडून मिळणारी माहिती व त्याचा वापर विद्यार्थ्यांनी जबाबदारीने करावा.
भय्यू महाराज म्हणाले, डी. वाय. पाटील विद्यापीठातून विविधेतून एकतेचे दर्शन घडत असून, ते राष्ट्रनिर्मितीचे केंद्र आहे. समाज हा बाजारवादाने पीडित असल्याने पुढे जाण्यासाठी जीवनात योग्य साथसंगत आवश्यक आहे. ते तरुणाईने लक्षात घ्यावे. शांतता, संयम व विश्वासाच्या जोरावर आयुष्यात पुढे जावे. यासाठी डी. वाय. पाटील यांच्या जीवनावर नजर टाकावी. दुसऱ्यांतील चांगले गुण घेण्याचा प्रयत्न करावा.
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, द्वेष, मत्सर, राग, अहंकार अशा भावना मनातून काढून टाका तरच जीवनात तुम्हाला अधिक चांगले यश मिळविता येईल. शिवाय परमेश्वर तुम्हाला निश्चितपणे साथ देईल. डॉ. भटकर म्हणाले, थोर व्यक्तींच्या जीवन मार्गाचा आदर्श घेऊन तरुणाईने कार्यरत रहावे. ते आयुष्यातील प्रगतीला सहाय्यभूत ठरेल. दीक्षान्त सोहळ्याच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक डॉ. ए. सी. पवार हे ‘ज्ञानदंड’ घेऊन प्रमुख पाहुणे, अधिष्ठातांसह दीक्षान्त मंडपात आले. कार्यक्रमास महापौर अश्विनी रामाणे, आमदार सुजित मिणचेकर, गायिका अनुराधा पौडवाल, शिवाजी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक
डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. एस. एच. पवार यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा सादर केला. कुलसचिव विश्वनाथ भोसले यांनी पदव्यांची माहिती दिली. निखिल दाते, मोना जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

के. एन. गणेश म्हणाले...
आगामी १५ वर्षांत दर्जेदार शिक्षण देणाऱ्या जगातील टॉप-५० देशांच्या यादीत समाविष्ट व्हायचे असल्यास ज्ञाननिर्मितीसह त्याची निर्यात करणे आवश्यक आहे.
कौशल्य विकासाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासाचे लक्ष्य असावे. हे साधण्यासाठी उच्च बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनी संशोधनात करिअर करावे.
विज्ञानातील आंतरशाखीय आव्हाने पेलण्यासाठी विज्ञानाचे प्रात्यक्षिक स्वरूपात शिक्षण देणे आवश्यक.
संशोधन कार्यात ‘टीमवर्क’ म्हणून सहभागी व्हा.
समाजासाठी त्यागाची तयारी ठेवणे सध्याच्या काळात आवश्यक आहे.

गणेश यांची खंत
आपल्या देशात ६०० विद्यापीठे, ३० हजार महाविद्यालये असूनदेखील दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची खंत डॉ. के. एन. गणेश यांनी व्यक्त केले.
सरकारने शिक्षणाबाबत गांभीर्याने विचार करावा. जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था उभारण्यासाठी गुणवंत पूर्ण शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांची पारदर्शक निवड, संशोधनावर भर आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे आवश्यक आहे.
शेवटची पदवी
माझ्या आध्यमिक, सामाजिक क्षेत्रातील कामाची सुरुवात डी. वाय. पाटील दादा यांच्यासमोर झाली आहे. त्यांनी खूप प्रेम दिले.
आता त्यांच्यासमोरच माझ्या सामाजिक जीवनातील निवृत्तीची मी घोषणा करीत आहे.

Web Title: Of N. Ganesh: Yes. D. Yadav to 'D'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.