नोटाबंदी आंदोलनांनी जिल्हा ढवळला!
By admin | Published: January 9, 2017 11:43 PM2017-01-09T23:43:43+5:302017-01-09T23:43:43+5:30
कॉँग्रेसचा मोर्चा : राष्ट्रवादीचा महामार्गावर रास्ता रोको
सातारा : बाजारातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने व्यवहारातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द ठरविल्या. त्यानंतर दोन महिने होऊनही सर्वसामान्यांचे हाल थांबलेले नाहीत. याचा निषेध करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोमवारी आक्रमक झाले. काँग्रेसने साताऱ्यात मोर्चा काढून घंटानाद आंदोलन केले. राष्ट्रवादीने पंधरा ठिकाणी रास्ता रोको केला.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाई तालुक्यातील सुरूर येथे दहा मिनिटे रास्ता रोको केला. यावेळी आमदार पाटील यांनी महामार्गावरच बैठक मारली होती.
साताऱ्यातील वाढेफाटा येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांची पोलिसांशी जोरदार झटापट झाली. पोलिसांनी विरोध करूनही वाढे फाटा येथे कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मारला. साताऱ्यात राष्ट्रवादी भवन ते वाढे फाटा असा बैलगाडीतून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सातारा व जावळी तालुक्यांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने जरंडेश्वर नाका परिसरात मोर्चा अडविला.
कऱ्हाडमधील कोल्हापूर नाका येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँगे्रस कऱ्हाड उत्तर व कऱ्हाड दक्षिणच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात अर्धातास रास्ता रोको केला. त्यामुळे चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. कोरेगाव येथे आयोजित केलेल्या रास्ता रोकोसाठी आमदार शशिकांत शिंदे बैलगाडीतून आले. वडूज, मेढा येथे रास्ता रोको, तर दहिवडी येथे मोर्चा काढण्यात आला होता. (प्रतिनिधी)
फलटणमध्ये आंदोलन
फलटण शहरासह तालुक्यात
फलटण-बारामती रस्त्यावर सांगवी, फलटण-लोणंद रस्त्यावर तरडगाव, फलटण-सातारा रस्त्यावर बिबी फाटा, फलटण-दहिवडी रस्त्यावर कोळकी, फलटण-पंढरपूर मार्गावर विडणी, फलटण-आसू रस्त्यावर गोखळी पाटी, फलटण-पुसेगाव रस्त्यावर ढवळपाटी येथेही रास्ता रोको करण्यात आला.