‘नाबार्ड’चे जिल्हा बँकेला ५७ लाखाचे अर्थसाहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:30 AM2021-02-25T04:30:10+5:302021-02-25T04:30:10+5:30
कोल्हापूर : नाबार्डकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दुर्गम भागातील खातेदारांना बँकिंग व एटीएम सुविधा देण्यासाठी ५७ लाखाचे अर्थसाहाय्य दिल्याची ...
कोल्हापूर : नाबार्डकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दुर्गम भागातील खातेदारांना बँकिंग व एटीएम सुविधा देण्यासाठी ५७ लाखाचे अर्थसाहाय्य दिल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. ए. बी. माने यांनी दिली. तीन मोबाईल व्हॅनसाठी ४५ लाख, तसेच बॅंकेच्या ग्राहकांना पुरविलेल्या रूपे डेबिट कार्ड सुविधेसाठी बारा लाख मिळाले आहेत.
नाबार्डकडून आर्थिक समावेशन निधीअंतर्गत जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या-वस्त्यांवर तसेच शाखा नसलेल्या गावांमधून बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी मोबाईल व्हॅनसाठी बॅंकेस अर्थसाहाय्य दिलेले आहे. तसेच ग्राहकांना रूपे डेबिट कार्डद्वारे कोणत्याही एटीएममधून रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून यापोटी नाबार्डने आर्थिक समावेशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा बँकेला हे अनुदान दिलेले आहे.
बॅंकेने जिल्ह्यात गाव तेथे बॅंकेची शाखा या धर्तीवर मायक्रो एटीएम सुविधा कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या - वस्त्यांमध्ये ५०० मायक्रो एटीएमद्वारे ग्राहकांना बॅंकिंग सुविधा पुरविली जाणार आहे. याकरिता नाबार्डकडून ३०० मायक्रो एटीएमसाठी ६७ लाखाचे अर्थसाहाय्य दिल्याची माहिती माने यांनी दिली.