‘नॅक’च्या समितीने साधला माजी विद्यार्थ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:12+5:302021-03-17T04:24:12+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) पुनर्मूल्यांकन प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी समितीने माजी विद्यार्थी, ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) पुनर्मूल्यांकन प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी समितीने माजी विद्यार्थी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. संगणक केंद्र, क्रीडा विभागातील सुविधांची पाहणी केली. मूल्यांकन प्रक्रियेचा आज, बुधवारी अखेरचा दिवस आहे.
डॉ. जे.पी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नॅक समिती सकाळी ९ वाजता विद्यापीठात दाखल झाली. सुरुवातीला त्यांनी ग्रंथालय, दुर्मीळ हस्तलिखिते केंद्र, क्रीडा विभाग, सिंथेटिक ट्रॅकसह अन्य क्रीडा सुविधा, योग केंद्र, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, कौशल्य व उद्योजकता व विकास केंद्र, वसतिगृहे, आरोग्य केंद्र, मुद्रणालय, आयक्यूएसी कक्ष व क्वाॅलिटी बेंचमार्किंग लॅबोरेटरी आदींची पाहणी केली. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये राजर्षी शाहू सभागृहात माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, गोवा येथील ‘एनआययो’मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ मंदार नानसकर, पुण्यातील ‘एनसीएल’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी.पी. वडगावकर, वस्तू व सेवाकर, कोल्हापूर विभागाच्या सहआयुक्त तेजस्विनी मोरे, वैद्यकीय क्षेत्रातील रणजित देसाई, बायोसायन्स क्षेत्रातील डॉ. विनायक केडगे, विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे निमंत्रक डॉ. प्रवीण कोडोलीकर आदी ५० माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाबाबतच्या भावना, मते, सूचना या समितीने जाणून घेतल्या. विद्यापीठाची कमवा व शिका योजना, प्रशासन चांगले असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. पीएच.डी.च्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फेलोशिप देण्यात यावी, अशी सूचना काही विद्यार्थ्यांनी यावेळी केली. सायंकाळच्या सत्रात कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ‘आयक्यूएसी’चे संचालक डॉ. एम.एस. देशमुख आणि विद्यापरिषद, व्यवस्थापन परिषदेसह विविध अधिकार मंडळांतील सदस्य, शासनाचे प्रतिनिधी, विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांसमवेत समिती सदस्यांनी संवाद साधला. या समितीच्या विद्यापीठातील मूल्यांकन प्रक्रियेत बुधवार अखेरचा दिवस आहे. त्यात समिती सदस्य सकाळच्या सत्रात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा, जलव्यवस्थापन आणि सांडपाणी पुनर्वापर, विद्यापीठाचे विविध उपक्रम, वैशिष्ट्यांची पाहणी करणार आहेत. गोपनीय अहवाल अंतिम करण्यासह त्यांची सायंकाळी निरोपाची बैठक होणार आहे.
चौकट
विद्यापीठाबाबतची आपुलकी जाणवली
माजी विद्यार्थ्यांसमवेतच्या संवादावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांची भेट झाली. त्यांनी वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग आणि विद्यापीठाची काही माहिती दिली. इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती या मेळाव्यासाठी उपस्थित राहिली. त्यावरून माजी विद्यार्थ्यांचे विद्यापीठाबाबतचे ऋणानुबंध, आपलुकी आणि आस्था जाणविली, असे ‘नॅक’ समितीचे अध्यक्ष डॉ. जे.पी. शर्मा यांनी विविध अधिकार मंडळांतील सदस्यांसमवेतच्या बैठकीपूर्वी उपस्थितांशी चर्चा करताना सांगितले.