नॅक सादरीकरणाची ठिकाणे, स्मार्ट क्लासरूमची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 11:00 AM2021-03-09T11:00:55+5:302021-03-09T11:02:39+5:30
Shivaji University Kolhapur- राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्यावतीने (नॅक) मूल्यांकनासाठी शिवाजी विद्यापीठात दि. १५ मार्चपासून समिती येणार आहे. त्याची विद्यापीठात वेगाने तयारी सुरू आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यापीठातील विविध अधिविभागांना भेट देऊन तेथील नॅक समितीसमोर विभागाची माहिती सादर केली जाणारी ठिकाणे, स्मार्ट क्लासरूम, आदींची पाहणी केली. काही सूचनाही त्यांनी विभागप्रमुखांना केल्या.
कोल्हापूर : राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्यावतीने (नॅक) मूल्यांकनासाठी शिवाजी विद्यापीठात दि. १५ मार्चपासून समिती येणार आहे. त्याची विद्यापीठात वेगाने तयारी सुरू आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यापीठातील विविध अधिविभागांना भेट देऊन तेथील नॅक समितीसमोर विभागाची माहिती सादर केली जाणारी ठिकाणे, स्मार्ट क्लासरूम, आदींची पाहणी केली. काही सूचनाही त्यांनी विभागप्रमुखांना केल्या.
ह्यनॅकह्य तयारीअंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या तयारीचा आढावा सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने घेण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून कुलगुरू डॉ. शिर्के आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत यांनी मानव्यशास्त्र इमारत, वि. स. खांडेकर भाषाभवनमधील विविध अधिविभाग, तर विद्यार्थी भवनाला भेट दिली. प्र-कुलगुरू डॉ. पाटील आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी विज्ञान विद्याशाखेशी संबंधित अधिविभागांना भेटी दिल्या.
या विभागांमधील स्मार्ट क्लासरूम सुरू आहेत का?, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेणाऱ्या सुविधांची व्यवस्था, सादरीकरणाच्या ठिकाणांवरील स्थिती, रंगरंगोटी व डागडुजी, साधनसामग्री, आदींची तपासणी केली. सोशल डिस्टन्सिंग, साफसफाई, नॅक समितीसमोर सादरीकरणाबाबतच्या काही सूचना यावेळी विभागप्रमुखांना करण्यात आल्या. सायंकाळी सहापर्यंत ही पाहणी सुरू होती.