नोटाबंदीचा दिवस ‘काळा दिन’ इचलकरंजीत मोर्चा, निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:32 AM2017-11-09T00:32:39+5:302017-11-09T00:35:50+5:30
इचलकरंजी : गतवर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून अचानक रद्द केल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ८६ टक्के चलन अचानक बाद झाल्याने सर्व क्षेत्रांत त्याचे विपरीत परिणाम होत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपा वगळता सर्वपक्षीयांच्यावतीने हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळून या निर्णयाच्या विरोधात येथील के. एल. मलाबादे चौकात निदर्शने केली. तसेच मोर्चाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतल्यानंतर ५० दिवसांत परिस्थिती सुधारेल, आर्थिक व्यवहार सुरळीत होतील, असे जाहीर केले होते. मात्र, ३६५ दिवस उलटले तरी त्यामध्ये सुधारणा झाली नाही. काळा पैसा नष्ट होईल, दहशतवादी कारवाया थांबतील, भ्रष्टाचार कमी होईल, अशा अनेक वल्गना केल्या होत्या. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. उलट या निर्णयामुळे देशाच्या बॅँकिंग व्यवस्थेवर मोठा ताण आला. पैसे बदलण्यासाठी रांगेत राहून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यासह अनेक विपरीत परिणामांना जनतेला सामोरे जावे लागले. त्यामुळे या तुघलकी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त हा दिवस काळा दिन म्हणून पाळावा लागत असल्याचे विरोधकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शशांक बावचकर, मदन कारंडे, सदा मलाबादे, आदींची भाषणे झाली. आंदोलनात सयाजी चव्हाण, प्रकाश मोरे यांच्यासह राष्टÑीय कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, माकप, भाकप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सर्व श्रमिक संघ, आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कबनुरात निषेध
कबनूर (ता. हातकणंगले) येथील विविध पक्ष व संघटना यांच्यावतीने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच मंडल अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, मोदी शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशवासीयांना मोठी हानी पोहोचविली आहे. सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे या हुकूमशाही शासनाचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी अशोक कांबळे, हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर, राहुल कांबळे, बी. जी. देशमुख, नीलेश पाटील, बबन केटकाळे, आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.