अंबाबाईच्या मूर्तीत नागाचा विसर
By admin | Published: August 6, 2015 01:11 AM2015-08-06T01:11:58+5:302015-08-06T01:12:53+5:30
‘पुरातत्त्व’च्या अधिकाऱ्यांची कबुली : मूर्ती अभ्यासकांनी संदर्भ देऊनही राहिली चूक
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सलग आठ दिवस केलेल्या संवर्धनानंतर आवश्यक ते संदर्भ आणि छायाचित्र देऊनही मूर्तीचा मुख्य भाग असलेला नाग घडविलेला नाही.
नागाशिवाय ही मूर्ती ‘कोल्हापूरच्या अंबाबाई’ची होऊच शकत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तातडीने मूर्तीवर पूर्ववत नाग घडविणे गरजेचे आहे.
रासायनिक संवर्धन प्रक्रियेसाठी २३ जुलैला अंबाबाई मूर्तीचे दर्शन
बंद करण्यात आले. आज, गुरुवारी देवीची मूर्ती दर्शनासाठी पूर्ववत खुली होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती कार्यालयाकडून ‘अंबाबाईच्या मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रियेपूर्वीचे’ व ‘रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतरचे’ छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात संवर्धन प्रक्रियेतील ही मोठी चूक निदर्शनास आली आहे.
मूर्ती संवर्धनाचे काम सुरू करण्यापूर्वी कोल्हापुरातील मूर्ती अभ्यासकांनी आणि जाणकारांनी अंबाबाईच्या मूर्तीची पुरातन छायाचित्रे, ग्रंथांतील संदर्भ अशी सगळी माहिती पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांना दिली होती आणि मूर्तीत नाग असणे गरजेचेच असल्याचे सांगितले होते. मात्र, संदर्भ देऊनही अधिकाऱ्यांनी मूर्तीवर तीन वेटोळे असलेल्या नागाच्या फण्याऐवजी मोठा मुकुट घडविला आहे. ‘आम्ही मूर्तीवर नाग घडविलेला नाही,’ हे पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. मूर्तिशास्त्रदृष्ट्या आवश्यक लक्षणांपैकी नाग, लिंग, गदा, खेटक, पानपात्र, म्हाळुंग ही चिन्हे आणि आयुधे असणारी मूर्तीच करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती ठरते.
यापैकी एखादे चिन्ह इकडचे, तिकडे झाले तरी मूर्तीचे स्वरूप बदलते. मूर्तीवर सन १९५५ मध्ये वज्रलेप झाला. त्यातही मस्तकावर नागाची प्रतिकृती घडविण्यात आली होती. कालौघात तिचे स्वरूप बदलले असले तरी मूर्तीवर नाग असणे आवश्यकच आहे.
नाग, लिंगाशिवाय मूर्तीच नाही...
अंबाबाई मंदिरात रोज म्हटल्या जाणाऱ्या ‘दुर्गासप्तशती’तील श्लोकात ‘मातुलुंग गदा खेटं, पानपात्रंच बिभ्रती, नाग, लिंगंच योनिंच बिभ्रती नृप मूर्धनी..’ असे देवीचे वर्णन आहे. अंबाबाईचे पुरातन छायाचित्र तसेच ब्रिटिश लायब्ररीच्या संग्रहात ब्रिटिश छायाचित्रकाराने अंबाबाईचे सन १८९४ मध्ये काढलेले छायाचित्र असून त्यात मूर्तीच्या मस्तकावर तीन वेटोळ्यांचा नाग स्पष्ट दिसतो. सन १९५५ मध्ये करण्यात आलेल्या वज्रलेपातही हा नाग घडविण्यात आला होता. मंदिर प्रकारातील ११ व्या शतकातील शिलालेखात ‘लिंगमशेषाघौघहारिणी’ असे देवीचे वर्णन आहे. हेमाद्रीच्या ‘चतुर्वर्गचिंतामणी’ या व्रतखंडात अशी मूर्ती केवळ करवीरातच असली पाहिजे, अशी नोंद आहे.
सोन्याच्या नागाचा पर्याय
मस्तकावर नाग, लिंग नसलेली मूर्ती अंबाबाईची होऊ शकत नाही. कारण ‘मस्तकी लिंग महीधर हस्तके दिव्य गदा मूर्ती’ असे तिचे वर्णन आहे. या संवर्धन प्रक्रियेनंतर मूर्तीच्या पुनर्प्राणप्रतिष्ठापनेच्या विधींना सुरुवात झाली आहे. तात्पुरता उपाय म्हणून सोन्याचा किंवा चांदीचा नाग मूर्तीवर ठेवून विधी करता येतील, असे मत मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा आणि प्रसन्न मालेकर यांनी व्यक्त केले आहे.