सात ग्रामपंचायती होणार नगरपंचायती
By admin | Published: March 3, 2015 12:17 AM2015-03-03T00:17:33+5:302015-03-03T00:27:52+5:30
लोकसंख्येचा निकष : शासनाने मागविल्या हरकती; शुक्रवारी अंतिम मुदत
कोल्हापूर : जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती होणार आहेत. गारगोटी, चंदगड, हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी-तनवाड, आजरा, राधानगरी यांचा यामध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यातील सर्व तालुकास्तरीय ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याची उद्घोषणा केली आहे. त्यासाठी शुक्रवार (दि.६)पर्यंत हरकती मागविल्या आहेत.
तालुकास्तरावर बहुतांश सर्व शासकीय कार्यालये आहेत. बाजारपेठाही आहेत; परंतु ग्रामपंचायत असल्याने तालक्याच्या ठिकाणच्या या गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यातील सर्व तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींच्या नगरपंचायती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत हरकती शुक्रवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावयाच्या आहेत. आलेल्या हरकतींवर शासनाकडून विचार होऊन त्यानंतर नगरपंचायतींची घोषणा केली जाईल.
जिल्ह्यातील सात तालुकास्तरीय ग्रामपंचायतींची माहिती यापूर्वीच नगरपालिका शाखेने शासनाला पाठविली आहे. त्यावरील हरकतीही वेळोवेळी सादर केल्या आहेत; परंतु शासनाच्या घोषणेनुसार कोल्हापुर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसंदर्भात पुन्हा हरकती घेण्यात येणार आहेत.
२५ हजार लोकसंख्येच्या पुढील गावांचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये, तर १० हजारांच्या पुढे लोकसंख्येच्या गावांचे नगरपंचायतींमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना २१ मे २०१२ ला नगरविकास विभागाने जिल्हा प्रशासनाच्या नगरपालिका विभागाला केल्या होत्या. सहायक संचालकांच्या अभिप्रायाबरोबरच २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व क्षेत्रफळ किती?, अकृषक रोजगाराची टक्केवारी किती?, प्रस्तावित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीशेजारी असणाऱ्या नगरपरिषदेचे नाव, यापूर्वी नगरपरिषद अथवा नगरपंचायत करण्यासाठी प्रस्ताव पाठविला असेल, तर त्या प्रस्तावाची प्रत अशी विस्तृत माहिती मागविली होती.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या नगर परिषद विभागाने १० हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील सात गावांची यादी तयार केली आहे. या गावांची शासनाला अपेक्षित असणारी सर्व माहिती संकलित करून ती यापूर्वीच पाठविण्यात आली आहे.
सध्या फक्त तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींची नगरपंचायती करण्यासंदर्भात उद्घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रस्तावांचा सध्या तरी विचार झालेला नाही. (प्रतिनिधी)
शासननिर्देशानुसार या हरकती ६ तारखेपर्यंत स्वीकारून दोन दिवसांत त्या शासनाकडे पाठविल्या जातील. त्यानंतर पुढील कार्यवाही शासनस्तरावरूनच होईल.
- ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका विभाग.