‘ज्ञानोबा माउली’च्या गजरात नगरप्रदक्षिणा

By Admin | Published: July 4, 2017 01:16 AM2017-07-04T01:16:23+5:302017-07-04T01:16:23+5:30

‘ज्ञानोबा माउली’च्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagar Pradakshina in the Gaza of Gyanoba Mauli | ‘ज्ञानोबा माउली’च्या गजरात नगरप्रदक्षिणा

‘ज्ञानोबा माउली’च्या गजरात नगरप्रदक्षिणा

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नंदवाळ पायी पालखी दिंडी सोहळ्याची नगरप्रदक्षिणा करवीरनगरीत सोमवारी ‘ज्ञानोबा माउली’च्या गजरात पार पडली.
या दिंडीत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या. वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर ‘ज्ञानोबा-ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा अखंड गजर केला. ज्ञानेश्वर पालखी सोहळा भक्त मंडळाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. पाच बैलगाड्या, पालखी रथ, अशा सजलेल्या लवाजम्यासह मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरापासून या नगरप्रदक्षिणा दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली. त्यात डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला व खांद्यावर वीणा घेतलेले वारकरी सहभागी झाले होते. पालखी दिंडी बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड- जोतिबा रोड-भवानी मंडप येथे आल्यानंतर रिंगण सोहळा झाला. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रिंगण सोहळ्यानंतर दिंडी मिरजकर तिकटी, शाहू बँक, पाण्याचा खजिना, टिंबर मार्केटमार्गे सासने इस्टेट येथे पोहोचली. याठिकाणी रात्री ७ ते ८ या कालावधीत ह.भ.प. एम. पी. पाटील (कावणेकर) ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान ह.भ.प आनंदराव लाड महाराज यांचे प्रवचन, कीर्तन झाले.
या दिंडीचे संयोजन जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळ, ज्ञानेश्वर माऊली पालखी (दिंडी) सोहळा भक्त मंडळ यांनी केले होते.
पालखी दिंडीचे पूजन महापौर हसिना फरास यांच्या हस्ते झाले. यावेळी अ‍ॅड. राजेंद्र किंकर, मंजुषादेवी पाटील, दीपक गौड, भक्त मंडळाचे बाळासाहेब पवार यांच्यासह दत्त भजनी मंडळ (गौळवाडा, शाहूवाडी), विठ्ठलपंथी भजनी मंडळ (कासारवाडी, राधानगरी), माऊली महिला भजनी मंडळ (देवाळे), बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट (हुपरी) चे भक्त मंडळ, वारकरी सहभागी झाले होते.
आज पुईखडी येथे रिंगण
आषाढी एकादशीनिमित्त आज, मंगळवारी सकाळी सात वाजता मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरातून नंदवाळकडे पायी पालखी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. दिंडी बिनखांबी गणेश मंदिर-निवृत्ती चौक, उभा मारुती-खंडोबा तालीम-जुना वाशी नाका, सानेगुरुजी वसाहतीमार्गे संकल्पसिद्धी मंगल कार्यालय पुईखडी येथे पोहोचणार आहे. येथील मोकळ्या जागेत रिंगण सोहळा होणार आहे. काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा पालखी दिंडी पिराचीवाडी, वाशी मार्गे श्री क्षेत्र नंदवाळ येथे मार्गस्थ होणार आहे.

Web Title: Nagar Pradakshina in the Gaza of Gyanoba Mauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.