नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरेंचा राजीनामा

By admin | Published: June 26, 2015 12:54 AM2015-06-26T00:54:33+5:302015-06-26T00:54:33+5:30

गडहिंग्लज नगरपालिका : शिंदे की गुरव याचा निर्णय हसन मुश्रीफ यांच्यावरच अवलंबून

Nagaradhchya Lakshmi Ghugarne resigns | नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरेंचा राजीनामा

नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरेंचा राजीनामा

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. त्यामुळे नगराध्यक्ष बदलावर अखेर शिक्कामोर्तब झाले. या पदासाठी इच्छुक असणाऱ्या अरुणा शिंदे व सरिता गुरव या दोघींनाही उर्वरित कालावधीत संधी मिळणार आहे. मात्र, पहिल्यांदा कुणाला संधी द्यायची याचा निर्णय दोघींनीही आमदार
हसन मुश्रीफ यांच्यावरच सोपविला आहे.पालिकेत राष्ट्रवादीचे बहुमत आहे. पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित नगराध्यक्षपदी मंजूषा कदम यांना संधी देण्यात आली. त्यानंतरच्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद इतर मागास
प्रवर्गासाठी आरक्षित झाले. राष्ट्रवादीकडे या प्रवर्गातील तीन नगरसेविका आहेत. त्यापैकी घुगरेंना पहिली संधी मिळाली. त्यानंतर शिंदे व गुरव यांना समान कालावधीसाठी संधी देण्याचे त्याचवेळी ठरले होते.दरम्यान, मिळालेल्या कालावधीची मुदत संपल्यामुळे एप्रिलमध्येच घुगरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला होता. मात्र, आपल्यालाच पहिल्यांदा संधी मिळावी यावर शिंदे व गुरव दोघीही ठाम राहिल्यामुळे नगराध्यक्ष बदलाचे घोडे अडले होते. त्यामुळे दोघींमध्ये एकमत घडविण्याचा सल्ला मुश्रीफ यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला होता.
तथापि, प्रयत्न करूनही त्यांच्यात एकमत न झाल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या दोघींची
दोन दिवसांपूर्वी मुश्रीफ यांच्याशी फोनवर चर्चा घडविली. त्यावेळी दोघींनीही मुश्रीफ यांचा निर्णय मान्य करण्याची तयारी दाखविली होती. (प्रतिनिधी)

दोनच मिनिटांत निर्णय !
आमदार मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची कागल येथे गुरुवारी बैठक घेतली. फोनवर झालेली चर्चा मान्य आहे का? असे त्यांनी शिंदे व गुरव यांना विचारले. त्यास दोघींनीही पुन्हा सहमती दर्शविली. भावी नगराध्यक्षांचे नाव निवडीच्या दिवशीच सुचविले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यालाही सर्वांनी संमती दिली. त्यानंतरच त्यांनी घुगरेंना राजीनामा देण्याची सूचना केली. त्यामुळे दोन महिन्यांपासून प्रलंबित नगराध्यक्ष बदलाचा निर्णय दोनच मिनिटांत झाला. बैठकीस नगरसेविका दीपा बरगे वगळता सर्व नगरसेवकांसह शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी उपस्थित होते.

Web Title: Nagaradhchya Lakshmi Ghugarne resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.