नागदेववाडी, वडणगेला मलेरियाचा विळखा
By admin | Published: September 18, 2015 12:30 AM2015-09-18T00:30:45+5:302015-09-18T00:33:41+5:30
आरोग्य विभाग हतबल : तीन महिन्यांपासून फैलाव, सध्या १६५ रुग्ण
कोल्हापूर : शहरालगत असलेल्या करवीर तालुक्यातील नागदेववाडी, वडणगे ही दोन गावे गेल्या तीन महिन्यांपासून मलेरियाच्या विळख्यात आहेत. साथ पूर्णपणे आटोक्यात येत नसल्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला आहे. परिणामी, हा आजार हद्दपार करणे हे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे.
शहरापासून पाच किलोमीटरच्या आत ही गावे आहेत. वडणगेची लोकसंख्या ११ हजार ९९८, तर नागदेववाडीची लोकसंख्या १८९० आहे. दोन्ही गावांत सेंट्रिंग व्यवसाय व बांधकाम कामगार यांची संख्या अधिक आहे. जूनपासून या दोन्ही गावांत हिवताप, मलेरियाचे रुग्ण मोठ्या संख्येने मिळत आहेत. शासनाचे आरोग्य पथक सक्रिय आहे. वेळीच उपाययोजनाही सुरू केल्या; परंतु रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणा चक्रावून गेली आहे. साथ पूर्णपणे आटोक्यात आणणे आव्हानात्मक बनले आहे.
प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्वरित उपचारांची सेवा दिली जात आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा होत असतो. यामुळे बहुतांश कुटुंबांचा पाणी साठवून ठेवण्याकडे कल आहे. साठविलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होत आहे. डासांच्या माध्यमातून हिवताप, मलेरिया फैलावत आहे. ग्रामस्थांना, साठविलेले पाणी झाकून ठेवा, कोरडा दिवस पाळा, डासांपासून वैयक्तिक संरक्षण करा, घराशेजारी पडलेल्या वाहनांच्या विनावापराच्या टायरची विल्हेवाट लावा, स्वच्छता ठेवा, असे आवाहन आरोग्य पथक करीत आहे.
१६५ रुग्ण
दोन्ही गावांत सध्या मलेरियाचे १६५ रुग्ण आहेत. थंडी, ताप ही लक्षणे आहेत. सात दिवसांपेक्षा अधिक काळ ही लक्षणे राहिल्यास रुग्णांची प्रकृती खालावते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच संबंधित रुग्णांनी रुग्णालयात उपचारासाठी जावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. परंतु, दोन्ही गावांतील मलेरियाच्या रुग्णांची मानसिकता त्वरित उपचार न घेण्याची झाल्याचे आरोग्य प्रशासनाने निष्कर्ष काढला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून वडणगे, नागदेववाडी गावांत मलेरियाचे रुग्ण आहेत. आरोग्य पथकांद्वारे प्रत्येक घरांचा सर्व्हे केला आहे. जागृतीही केली आहे, तरीही
या दोन गावांतील मलेरिया पूर्णपणे आटोक्यात येत
नाही. आजार आटोक्यात येण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे.
- संतोष तावशी,
जिल्हा साथरोग नियंत्रण वैद्यकीय अधिकारी