नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रस्ता भूसंपादनाचे ५४४ कोटी जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 01:14 PM2023-01-19T13:14:36+5:302023-01-19T13:15:10+5:30
परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार
कोल्हापूर : नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात येत असलेल्या चोकाक ते आंबा टप्प्यातील भूसंपादनासाठी आतापर्यंत ५४४ कोटी ६१ लाख इतक्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेची टक्केवारी ४५.१३ असून, जिल्हा भूसंपादन विभागाच्यावतीने युद्धपातळीवर नुकसानभरपाई वाटपाचे काम सुरू आहे. ते अधिक जलदगतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची विभागात नियुक्ती केली आहे. परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार आहेत.
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील कोल्हापूर जिल्ह्यातील लांबी ७८ किलोमीटर असून, त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते आंबा येथील भूसंपादन करण्यात येत आहे. त्यात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने १२०६.७२ कोटी रुपये भूसंपादन विभागाला वर्ग केले आहेत. त्यापैकी ५४४ कोटी ६१ लाख वाटप विभागाने पूर्ण केले आहे.
यात मूळ निवाडे ४९ व अतिरिक्त निवाडे ६९ असे एकूण ११८ निवाडे पूर्ण झाले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्यासाठी आता गावनिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. यापूर्वी झालेल्या शिबिरात ५५० अर्ज आले होते. तपासणी पूर्ण करून त्यांना मोबदला वाटप सुरू झाले आहे. ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आहे ते अर्ज पुन्हा तलाठ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात गावनिहाय शिबिर ठेवण्यात आले आहे.
तालुकानिहाय बाधित गावांची यादी
तालुका : गाव
शाहुवाडी : २५
पन्हाळा : १०
करवीर : ८
हातकणंगले : ६
एकूण : ४९ गावे
१० कोटी न्यायालयात जमा
काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे न्यायालयीन वाद सुरू आहे. या वादाच्या प्रकरणातील १० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात येत आहेत.
तक्रारीत अडकले १५० कोटी
जमिनीच्याबाबतीत अनेक शेतकऱ्यांचे कौटूंबिक वाद आहेत. एकाच जागेवर अनेकांचा दावा आहे. अशी तक्रारीतील प्रकरणे सध्या बाजूला ठेवली जात आहेत. चार तालुक्यांपैकी हातकणंगले येथील ३८ कोटी करवीर मधील ४५ कोटी रुपये तक्रारीत अडकली आहेत. आणखी दोन तालुक्यांच्या तक्रारी काढण्याचे काम सुरू असून ही रक्कम जवळपास १५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले प्रकरण दाखल करून नुकसान भरपाई घ्यावी. व महामार्ग पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. - शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी भूसंपादन कोल्हापूर.