‘नमामि पंचगंगा’ प्रकल्प त्वरित राबविण्यात यावा
By admin | Published: April 11, 2017 12:01 AM2017-04-11T00:01:02+5:302017-04-11T00:01:02+5:30
संभाजीराजे : मंत्री उमा भारतींकडून प्रतिसाद
कोल्हापूर : ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर कोल्हापूरकरांची जीवनरेखा असणाऱ्या पंचगंगा नदीसाठी ‘नमामि पंचगंगा’ हा प्रकल्प केंद्राने तातडीने राबविण्याची मागणी सोमवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेत केली. त्यासाठी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय नदी व संवर्धन योजनेअंतर्गत तातडीने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे याकडे संभाजीराजे यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात सभागृहाचे लक्ष वेधले.
त्यावर केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोल्हापूरला ‘दक्षिण काशी’ म्हटले जाते, पण कोल्हापूरकरांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेली पंचगंगा आज जगातील प्रदूषित नद्यांमध्ये गणली जात आहे. त्यामुळे प्रदूषित पाण्यामुळे होणारे पोटांचे आणि आतड्यांचे विकार यामुळे शहराच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे म्हणून पंचगंगेचे प्रदूषण रोखण्याची तातडीने गरज आहे.
यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा परिषेदेने राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पंचगंगा शुद्धिकरणासंदर्भात पाठविलेला प्रस्ताव केंद्रीय व वने पर्यावरण मंत्रालयाने फेटाळला. मात्र, पंचगंगेच्या प्रदूषणाची तीव्रता लक्षात घेऊन या प्रकल्पाला मान्यता द्यावी आणि या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले पाहिजे. तसे जर घडले तर ‘नमामि पंचगंगा’ हा प्रायोगिक प्रकल्प छोट्या नद्यांच्या संवर्धनासाठी आदर्शवत ठरू शकतो, अशी खात्री संभाजीराजे यांनी व्यक्त
केली.