Kolhapur: उपनगराध्यक्ष कार्यालयात नमाज पठण, मुरगूड नगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना डच्चू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 01:08 PM2024-08-08T13:08:21+5:302024-08-08T13:08:45+5:30
परिपूर्ण तपासासाठी समिती स्थापन
मुरगूड : मुरगूड नगरपालिका इमारतीमध्ये उपनगराध्यक्ष कार्यालयात नमाज पठण केल्याप्रकरणी ठेकेदारी पद्धतीने नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून डच्चू दिला आहे, तर या घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी नगरपालिका प्रशासनाने विशेष समितीची स्थापना केली आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारलेल्या मुरगूड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नमाज पठण करणाऱ्या त्या दोन युवकांवर शासकीय कार्यालयात विनापरवाना प्रवेश करून नमाज पठण केल्याप्रकरणी मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.
मंगळवारी आठवडी बाजारात व्यापार करण्यासाठी निपाणीहून आलेल्या दोन युवकांनी चक्क नगरपालिका कार्यालयात घुसून नगराध्यक्ष केबिनमध्ये नमाज पठण केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हजारोंचा जमाव पालिका व पोलिस स्टेशन आवारात जमला होता. वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री बुधवारी मुरगूड बंदची हाक देत संतप्त नागरिक घरी परतले होते.
बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सर्व नागरिक शिवतीर्थावर एकत्र जमले होते. दरम्यान, सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. एकत्र जमलेले नागरिक शहरातून निषेध फेरी काढत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. जमाव बंदी आदेश असल्याने रॅली काढू नये अशी विनंती पोलिसांनी केल्यानंतर आंदोलक व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. शेवटी कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हे नोंद केले जातील हे सांगितल्यावर निषेध फेरी रद्द करून त्याच ठिकाणी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
या प्रकरणी पालिकेचे कोण कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्याकडे केली. त्यानुसार मुख्याधिकारी यांनी याप्रकरणी कामात हयगय केल्याच्या ठपका ठेवून ठेकेदार पद्धतीने नेमलेल्या दोन कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. शिवाय या घटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी पालिकेतील वरिष्ठ चार अधिकाऱ्यांच्या समितीची स्थापना केली आहे.
याद्वारे पालिका इमारत परिसर व कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असून, अन्य कोणी दोषी असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यामध्ये नगरपालिका कार्यालय व मुस्लीम समाजाच्या प्रार्थनास्थळाजवळ राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.