नामदेवराव भोईटे प्रथम पुण्यस्मरण लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:35+5:302021-03-15T04:22:35+5:30
सहकार क्षेत्रातील बिद्री साखर कारखाना, हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणी, पांडुरंग नागरिक पतसंस्था, दूध साखर माध्यमिक विद्यालय, राधानगरी महाविद्यालय, नामदेवराव ...
सहकार क्षेत्रातील बिद्री साखर कारखाना, हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणी, पांडुरंग नागरिक पतसंस्था, दूध साखर माध्यमिक विद्यालय, राधानगरी महाविद्यालय, नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय, आदी ठिकाणी आपल्या विकासकामाचा ठसा त्यांनी उमटविला आहे. कार्यकर्ते, जनतेला सरांचे काम नेहमी प्रामाणिकता व प्रेरणादायी ठरले आहे.
राधानगरी-भुदरगड मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने अनेक गावे विकासापासून वंचित होती. अनेक गावांमध्ये रस्ते, वीज, आरोग्य सेवा, तसेच दळणवळणाचे साधने नसल्याने हा मतदारसंघ मागासलेला म्हणून परिचित होता. अशातच सरांनी सन १९९५ मध्ये विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. नेत्यांचा आदर, कार्यकर्त्यांची साथ व सर्वसामान्य जनतेलाही मायेची साद देत आमदारकीही पदरी पाडून घेतली. त्या काळात त्यांनी सर्वाधिक निधी खेचून आणला.
मतदारसंघातील सर्वच भूभागच्या क्षेत्रफळासह कार्यकर्त्यांच्या नावाची जाण असणारा, प्रत्येक घराच्या चुलीपर्यंत निर्वेध वावर असणारा एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख होती. कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. विकासकामाचा अजेंडा डोळयासमोर ठेवून काम केले. तत्कालीन सत्तेवर असणाऱ्या शिवसेना-भाजप पक्षाच्या सत्तेचा वापर करत मतदारसंघातील प्रलंबित असणारे रस्ता, वीज, शैक्षणिक व आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय उभे करण्यात मोठा वाटा आहे. धनगरवाडा डोंगराळ रानात राहणाऱ्या जनतेसाठी विकास महामंडळाच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी खेचून अनेक प्रश्न मार्गी लावले. ऐन उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना यशस्वी केल्या. याबाबत त्यांनी तत्कालीन अधिकारी व्ही. एस. पाटील (सोळांकूरकर) यांच्या सहकार्याने मार्गी लावल्या. कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवून, तर कधी दम देऊन काम करून घेत. सर उंचीने कमी होते. सरांच्या कामामुळे त्यांना मूर्ती लहान, पण कीर्ती महान या नात्याने त्यांची ओळख निर्माण झाली होती.
त्यांच्या सामाजिक व राजकीय प्रवासात खऱ्या अर्थाने खांद्याला खांदा देऊन साथ देणाऱ्या पत्नी सुशीला भोईटे, तसेच त्यांचे थोरले चिरंजीव व बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे, दुसरे चिरंजीव महेश भोईटे, त्यांच्या सुना जि. प. सदस्या सुमित्रा भोईटे व दीपाली भोईटे यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. त्यांचे नातू शुभम भोईटे हे देखील सामाजिक कार्यात सक्रिय असतात.
विद्यादान करणारे ‘ज्ञानयोगी’, सर्वसामान्यांचे काम करणारे ‘कर्मयोगी’, विद्याभवन ही विधानसभा प्रवास करणारे 'राजयोगी' असा त्रिवेणी संगम असणारे माजी आमदार नामदेवरावजी भोईटे सर यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व स्तरावरून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... सरांची अपुरी राहिलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी भोईटे परिवाराला पाठबळ देऊया.
निवास पाटील, सोळांकूर, लोकमत