राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 01:52 PM2020-02-25T13:52:19+5:302020-02-25T13:54:14+5:30
राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार नामदेवराव भोईटे (वय ८९) यांचे मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार नामदेवराव भोईटे (वय ८९) यांचे मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
राजकारणाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात आपल्या कतृत्वाने वेगळा ठसा उमटविणारे नामदेवराव भोईटे यांच्यावर कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पालकरवाडी येथील भोईटे हायस्कूलमध्ये दुपारी दोन वाजेपर्र्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कसबा वाळवे गावातून अंत्ययात्रा निघणार असून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथे अतिशय सामान्य कुटूंबात भोईटे यांचा जन्म झाला. शिक्षक असलेल्या नामदेवरावांनी नंतर राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. राधानगरी पंचायत समितीवर निवडून गेलेले नामदेवराव नंतर सभापती झाले. त्यानंतर काँग्रेसकडून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले.
अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून तेथे त्यांनी नावलौकिक मिळविला. त्यानंतर त्यांनी पक्षाकडे राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून उमेदवारी मागितली, तथापि पक्षाने तेव्हा उमेदवारी नाकारल्याने त्यांनी १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि विजयी झाले. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. सध्या ते मुदाळ येथील हुतात्मा वारके सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष होते. राधानगरी तालुक्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आहेत.