सुशोभीकरणाच्या नावाखाली ‘शिवपुतळा’ परिसरात खेळखंडोबा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 04:34 PM2019-05-08T16:34:47+5:302019-05-08T16:41:29+5:30
शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या श्रम, भावना, आस्थेचे प्रतीक आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली या परिसराचा खेळखंडोबा करण्यात येऊ नये. बगीचा परिसराचा मूळ ढाचा कायम ठेवावा, अशी मागणी शिवप्रेमी आणि विद्यापीठातील घटकांकडून होत आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवराय यांचा अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरातील बगीचा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या श्रम, भावना, आस्थेचे प्रतीक आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली या परिसराचा खेळखंडोबा करण्यात येऊ नये. बगीचा परिसराचा मूळ ढाचा कायम ठेवावा, अशी मागणी शिवप्रेमी आणि विद्यापीठातील घटकांकडून होत आहे.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील सुमारे दोन एकर परिसरात शिवपुतळा आणि बगीचा साकारण्यात आला आहे. माजी कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार आणि माजी कुलसचिव उषा इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली या बगीचा परिसराचे काम सन १९६५ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून विटा तयार करून या बगीचा, त्याचा वर्तुळाकार संरक्षक कठडा, आदींचे काम केले.
त्यानंतर सन १९७४ मध्ये या बगीचाच्या मध्यभागी शिवपुतळा बसविण्यात आला. त्यामुळे परिसराबाबत संबंधित घटकांचे भावनिक बंध आहेत. या बगीचा परिसराला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. पुतळ्याकडे जाणारे चार बाजूंचे फुटपाथ खराब झाले आहेत.
पुतळा धुण्यासाठी त्या ठिकाणी वाहन जाण्याकरिता या फुटपाथची रुंदी वाढविणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, या परिसराचा मूळ ढाचा मोडून त्यात बदल करणे म्हणजे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे श्रम, आस्था आणि भावनेशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे या परिसराचा मूळ ढाचा कायम ठेवणे, पावित्र्य जपणे हे लक्षात घेऊन सुशोभीकरण करणे आवश्यक आहे.
नागरी कृती समितीचा विरोध
सुशोभीकरणाअंतर्गत बगीचाच्या संरक्षक कठड्याचे (रेलिंग) काम काळ्या दगडांमध्ये करावे; त्यासाठी सध्या वापरलेला दगड आणि रचनेला समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समितीने विरोध केला आहे. शहरातील महाराणी ताराराणी चौक, निवृत्ती चौकातील शिवाजी अर्धपुतळा परिसरातील संरक्षक कठड्याचे काम पाहून विद्यापीठ प्रशासनाने पुढील काम करावे, अशी मागणी या समितीने केली आहे.
तीन वर्षांपूर्वी नाकारला प्रस्ताव
या परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव विद्यापीठाच्या बांधकाम समितीसमोर तीन वर्षांपूर्वी आला होता. त्यावेळी बगीचा परिसरातील नव्या रचनेतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी हा प्रस्ताव समितीने नाकारला होता. गेल्या आठ महिन्यांपूर्वी हेरिटेज समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली.
सुशोभीकरणात याचा विचार व्हावा...
- या पुतळा परिसरातील बगीच्याचा मूळ ढाचा कायम ठेवावा.
- फूटपाथवर प्रवेशाची त्रिकोणी रचना, त्या ठिकाणी बैठक व्यवस्था करणे टाळावे.
- रात्रीच्या वेळी शिवपुतळा स्पष्टपणे दिसेल अशी प्रकाशव्यवस्था येथे करावी.
- पुतळा परिसरातील बगीचा बारा महिने हिरवागार राहण्याची व्यवस्था करावी.
विद्यापीठातील शिवपुतळा आणि बगीचा परिसराला मोठा इतिहास आहे. पुतळा उभारणी, बगीचा तयार करण्यामध्ये शेतकरी, विद्यापीठातील कर्मचारी, कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी योगदान दिले आहे. आता सुशोभीकरणाच्या नावाखाली या घटकांचे योगदान, इतिहास पुसण्याचे काम होऊ नये. त्याची मोडतोड करण्यात येऊ नये. वास्तविकपणे पाहता या परिसरात सुशोभीकरणाची गरज नाही.
- संभाजीराव जगदाळे,
माजी कर्मचारी, शिवाजी विद्यापीठ
या बगीचा परिसराच्या रेलिंगसाठी सध्या वापरलेला दगड चांगला नाही. शिवाय रेलिंगची रचना मुगलशाही पद्धतीची वाटते; त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. ही रचना आणि दगड बदलावा. रेलिंगची रचना मराठेशाही किल्ल्यांवरील संरक्षण कठड्याला असते, तशी करावी; त्यासाठी जोतिबा डोंगरावरील दगड वापरावा. बगीचा परिसराच्या मूळ ढाच्याची मोडतोड करण्यात येऊ नये.
-अशोक पोवार,
सदस्य, समस्त कोल्हापूरवासीय शिवभक्त नागरी कृती समिती