‘बोलेमामांचा वडापाव’ राखणार नाव!--चारही मेहनती मुली सरसावल्या :

By admin | Published: September 11, 2014 10:05 PM2014-09-11T22:05:40+5:302014-09-11T23:13:03+5:30

कोसळलेल्या भिंतीखाली दबलेलं स्वप्न मागतंय फक्त सातारकरांचा हात--लोकमत इनिशिएटिव्ह---संपर्क : 9850384376

The name of 'Boleamam Vada Paav' will be maintained! - Four hardworking girls have got: | ‘बोलेमामांचा वडापाव’ राखणार नाव!--चारही मेहनती मुली सरसावल्या :

‘बोलेमामांचा वडापाव’ राखणार नाव!--चारही मेहनती मुली सरसावल्या :

Next

सातारा : कोसळलेल्या भिंतीखाली गाडलेली कढई माती झटकून पुन्हा आगीवर स्वार व्हायला आतुरलीय. विसर्जनाच्या रात्री ढिगाऱ्याखाली बोलेमामांच्या छातीवर आडवा सापडलेला सिलिंडर पुन्हा उभा राहतोय. मामांच्या एकाहून एक जिद्दी अशा चार मुली ‘बोलेमामांचा वडापाव’ हे सातारकरांच्या जिभेवर कोरलेलं नाव राखायला सरसावल्यात. फक्त गरज आहे ती उत्सवी जल्लोषानंतर निद्रिस्त झालेली सातारकरांची संवेदना जागृत होण्याची.
नाव: चंद्रकांत भिवा बोले. वयाच्या ६४ व्या वर्षी एक कप चहा देण्यासाठी चाळीस पायऱ्या चढणारा कष्टाळू माणूस. पत्नी सुनंदा यांच्यासह गीता, वैशाली, नीता आणि हेमांगी या चार मुलींचा एकमेव आधार. दिवसभर कॅन्टीन चालवून शे-दीडशेच हाती पडतात म्हणून संध्याकाळी न थकता वडापावची गाडी लावणारा. अपार मेहनतीतून मुलींना शिक्षण देणारा. पंधरा दिवस व्यवसाय बंद राहील, या धास्तीनं मोतिबिंदूचं आॅपरेशन कायम पुढं ढकलत राहणारा. सकाळी सातला घराबाहेर पडून १६ तास मेहनत करून रात्री अकराला घरी परतणारा हा आदर्श पिता सोमवारी रात्री मुलींच्या डोळ््यादेखत राजपथावर कोसळलेल्या भिंतीने गिळून टाकला.
मुलींच्या डोळ्यातलं पाणी आटत नाही. ‘कशाचीही काळजी न करता फक्त शिका,’ असं म्हणणाऱ्या पित्याच्या आठवणी सांगून संपत नाहीत. पित्याला ओढून नेणारी काळरात्र तर सेकंदा-सेकंदानं आठवत राहते. पोलिसांनी दमदाटी करून वडापावची गाडी धोकादायक भिंतीजवळ उभी करणं कसं भाग पाडलं, आदल्या दिवशी याच प्रकारामुळं गांगरलेल्या बोलेमामांच्या हातून बेसनपिठाचं पातेलं कसं पडलं होतं, भिंत हादरू लागताच ‘डॉल्बी बंद करा’ म्हणून फोडलेला टाहो कुणालाच कसा ऐकू गेला नाही, भिंत कोसळल्यावर पित्याच्या बचावासाठी मिरवणुकीतल्या बाप्पांच्या मूर्तीपुढेच आपण कसा हात पसरला, हे सांगताना वैशालीचा गळा दाटून आला. सगळ्या मुली ग्रॅज्युएट. धाकटी हेमांगी तर एमबीए करतेय. चौघींपैकी दोघी विवाहित. आईला गुडघेदुखीचा त्रास. पण या चारही बहिणींना पुन्हा कष्टानं उभारी घ्यायचीय. ‘बोलेमामांचा वडापाव’ हे पित्यानं कमावलेलं नाव राखून त्याचं स्वप्न साकार करायचंय. (प्रतिनिधी)

कुठे गेली होती संवेदनशीलता?
४डॉल्बीच्या थयथयाटाने रस्त्यावरच्या चेंबरचे लोखंडी झाकणसुद्धा जोरजोरात हलत होतं.
४भिंत कोसळल्यावरही पोलीस घटनास्थळी येईपर्यंत समोरच्या डॉल्बीचा दणदणाट सुरूच होता.
४‘इथे आमचे वडील आहेत,’ असे मामांच्या मुली ओरडून सांगत असतानाही ढिगाऱ्यावर त्याच ठिकाणी उभे राहून काहींनी फोटो काढले.
४बुधवारी पालिकेने इमारत पाडल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेली वडापावची गाडी जेव्हा दिसू लागली, तेव्हा एकाने ती चोरण्याचा प्रयत्न केला.

सातारकरांनो चला, भरपाई करूया !
गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना भिंत कोसळण्याच्या घटनेस जबाबदार कोण, यावर मंथन सुरू आहे आणि तपासही. परंतु दुर्घटनेची जबाबदारी निश्चित होवो न होवो, बोलेमामांच्या कष्टाळू मुलींना मानसिक उभारी आणि आर्थिक पाठबळ देणं ही संवेदनशील सातारकरांची सामूहिक जबाबदारी आहे. चला, उत्सवाच्या जल्लोषात आपल्यापैकीच काहीजणांच्या हरवलेल्या संवेदनशीलतेची भरपाई सारे मिळून करू या.
गणेश विसर्जनाच्या दिवशी वडापावचा व्यवसाय जोरात झाल्यामुळं चंद्रकांत बोले यांच्या खिशात चार ते पाच हजारांची रोकड जमा झाली होती. एटीएम, आधारकार्डही खिशातच होतं. मात्र, शवविच्छेदनानंतर आम्ही मामांचा मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा पँटचे दोन्ही खिसे उलटे होऊन बाहेर आले होते... आत काहीच नव्हतं.
- वामन बोले, चंद्रकांत यांचे बंधू

Web Title: The name of 'Boleamam Vada Paav' will be maintained! - Four hardworking girls have got:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.