गोगवेच्या क्रीडासंकुलास शहीद सावन माने यांचे नाव
By admin | Published: June 27, 2017 01:15 AM2017-06-27T01:15:03+5:302017-06-27T01:15:03+5:30
पालकमंत्र्यांची ग्वाही : माने यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन; राज्य शासनाकडून आठ लाखांची मदत देणार
लोकमत न्यूज नेटवर्क--बांबवडे/कोल्हापूर : भारतीय सीमेचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या शहीद जवान सावन माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोगवे (ता. शाहूवाडी) येथील प्रस्तावित शासकीय क्रीडासंकुलास शहीद सावन माने यांचे नाव देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे दिली. त्यांनी शहीद माने यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करीत राज्य शासनातर्फे आठ लाखांची मदत देण्यात येईल, असे सांगितले.गोगवे (ता. शाहूवाडी) येथील शहीद जवान सावन माने यांच्या घरी दुपारी पालकमंत्री पाटील यांनी भेट देऊन वडील बाळकू माने, भाऊ सागर माने यांच्यासह कुटुंबीयांचे सांत्वन केले.त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असून, शासन पूर्णपणे त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. राज्य शासनाच्या वतीने शहीद जवान माने यांच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत प्राधान्याने दिली जाईल. याबरोबरच केंद्र सरकारची १० लाखांची मदत मिळेल. त्यासाठीचे प्रस्ताव पन्हाळा प्रांताधिकारी अजय पवार यांनी तत्काळ तयार करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या सैनिकांसाठी असणाऱ्या विमा योजनेतून २४ लाख रुपयांची मदतही मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
जमीन देण्यासाठी प्रयत्नशील
शहीद सावन माने यांचे वडील सैन्यात सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. त्यांचे भाऊ सागर माने हेही सैन्यात सेवा बजावीत आहेत. संपूर्ण कुटुंब देशरक्षणार्थ सेवा बजावणारे आहे; पण या कुटुंबाकडे जमीन नाही. निवृत्त सैनिकांना शासकीय जमीन देण्याबाबतच्या कायद्यात बदल झाला आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जमीन कशी उपलब्ध करून देता येईल, याचा अभ्यास करावा, असे निर्देश पालकमत्र्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले.