शाळेस राजर्षी शाहूंचे नाव द्या
By admin | Published: March 22, 2015 12:37 AM2015-03-22T00:37:07+5:302015-03-22T00:39:49+5:30
‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ नाव प्रकरण : ‘क्रांतिनगर’ नावावर आक्षेप, प्रशासनाची कोंडी
कोल्हापूर : जिल्ह्यातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथील शाळेचे ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ असे नाव असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर शिक्षण प्रशासन नामांतरासाठी धावपळ करीत आहे. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने शाळेचे ‘विद्यामंदिर क्रांतिनगर’ असे नामकरण करण्याच्या दिलेल्या प्रस्तावावर सदस्य विकास कांबळे यांचा आक्षेप आहे. राजर्षी शाहू महाराज असे नामकरण करावे, अशी त्यांची मागणी आहे. नामांतराचा निर्णय झाला आहे; पण नाव कोणते द्यावे, याबद्दल एकमत होत नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे.
‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे विविध दलित संघटनांनी नामांतराची मागणी लावून धरली आहे. अजूनपर्यंत नामांतर न केल्याबद्दल शिक्षण प्रशासनावर जोरदार टीका होत आहे. भारिप बहुजन महासंघाने त्या शाळेचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिर’ असे, तर युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशनने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर’ असे नामकरण करावे, अशी मागणी केली.
दरम्यान, या दोन्ही नावांना बगल देऊन शिक्षण प्रशासनाने स्थानिक शिक्षण समितीने दिलेल्या ‘क्रांतिनगर’ नावाचा प्रस्ताव शिक्षण समितीत ठेवला. त्याला मंजुरीही मिळाली. मात्र, क्रांतिनगर हा परिसर तेथे असल्याची शासकीय दप्तरी कोठे नोंद असल्याबाबत पुरावा नाही. मग ते नाव का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या शाळेला कांबळे यांनी शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नावावर एकमत होऊन मंगळवारी (दि.२४) होणाऱ्या सभेत शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच नाव कोणते असावे,यावर भिन्न विचारप्रवाह समोर येत आहेत. ( प्रतिनिधी )