जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची नावे तटकरे जाहीर करणार
By admin | Published: March 4, 2017 11:47 PM2017-03-04T23:47:54+5:302017-03-04T23:47:54+5:30
राष्ट्रवादीच्या प्रदेश बैठकीत निर्णय; पुढील आठवड्यात बैठक सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी
निवडीबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्वत: सातारा जिल्ह्यात बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. येत्या दि. २६ मार्च रोजी आमदार अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन सदस्यांचा साताऱ्यात गौरव करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित
पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच साताऱ्यातून विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, प्रदेश प्रतिनिधी सुरेंद्र गुदगे, विद्यार्थी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब महामुलकर आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या नंबरचा ठरला आहे. ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे काँगे्रसला सोबत घेण्याचे धोरण ठरविण्यात आले.
राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकांचा पक्ष
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने ५६ लाख, तर भाजपने ६० लाख मते घेतली आहेत. ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे ३६० सदस्य, तर भाजपचे ४३० सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचे गौरवोद्गारही खासदार शरद पवार यांनी या बैठकीत काढले.
पदाधिकारी निवडीची बैठक जिल्हानिहाय
पदाधिकारी निवडीची बैठक जिल्हानिहाय घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्वत: या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीने मोठे यश मिळविले.
जिल्हा परिषदेच्या ६४ जागांपैकी ३९ जागा राष्ट्रवादीने जिंकून बहुमताने सत्ता मिळविली. कऱ्हाड वगळता सातारा, वाई, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर, फलटण, माण, खटाव, पाटण, कोरेगाव या पंचायत समित्यांमध्येही राष्ट्रवादीने बहुमताने सत्ता मिळविली आहे. याचा गौरव या बैठकीत करण्यात आला.