विद्यापीठाचा नामविस्तार म्हणजे अस्मितेलाच धक्का

By admin | Published: December 27, 2016 12:59 AM2016-12-27T00:59:31+5:302016-12-27T00:59:31+5:30

मागणी चुकीची : ‘शिवाजी’ ऐवजी ‘सीएसएम’ असे होईल नाव; विरोध करणे गरजेचे

The name of the University is as exaggerated | विद्यापीठाचा नामविस्तार म्हणजे अस्मितेलाच धक्का

विद्यापीठाचा नामविस्तार म्हणजे अस्मितेलाच धक्का

Next

विश्वास पाटील --कोल्हापूर --जगभर ‘शिवाजी’ हेच नाव लोकांच्या तोंडातून बोलले जावे, असा विचार करूनच येथील विद्यापीठास ‘शिवाजी विद्यापीठ’ असे नाव स्थापनेवेळीच दिले आहे. त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आहे, असे असताना आता इतके चांगले नाव बदलून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे. त्यास आताच विरोध करून ती हाणून पाडण्याची गरज आहे. अन्यथा थेट ‘शिवाजी विद्यापीठ’ऐवजी ते ‘सीएसएम विद्यापीठ’ असे ओळखले जाण्याची भीती आहे.
चार वर्षांपूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी ही मागणी केली होती. त्यांना वस्तुस्थिती माहीत झाल्यावर ही मागणी मागे घेतली. आता परत शिवसेनेचेच आमदार असलेल्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुन्हा तीच मागणी केली असून, त्यास काही हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आपण शिवाजी असो की शाहू महाराज असोत त्यांचा उल्लेख ‘शिवाजी’ व ‘शाहू महाराज’ असा करतो. त्यामागे एकेरी नव्हे तर आदराचीच भावना असते; परंतु नाव बदलण्याची नवी टूम आता काहींनी काढली आहे. तत्कालीन कुलसचिव असलेले सूर्याजीराव साळुंखे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला ते म्हणाले, ‘कोल्हापूरला विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाल्यावर शासनाने प्रिन्सीपल शि. रा. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील खास समिती स्थापन केली. त्यामध्ये व्ही. ए. आपटे, सांगलीचे भास्करराव पाटील, सोलापूरचे प्रिन्सीपल भगवान, ना. सि. फडके, बॅरिस्टर खर्डेकर आणि प्रा. एन. डी. पाटील आदींचा समावेश होता. त्यावेळीही विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज’ ठेवावे असा विचार पुढे आला होता; परंतु त्यावेळी मुख्यत: बडोदा विद्यापीठाचे काय झाले, याचा विचार झाला. ‘महाराजा सयाजीराव विद्यापीठ’ असे नाव असून त्याची ओळख ‘एमएस विद्यापीठ बडोदा’ अशी झाली आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ याऐवजी ते ‘सीएसएम विद्यापीठ’ होईल. तसे होऊ नये. त्यामुळे आता नामविस्तार करण्याची मागणी चुकीची आहे.’


अनुभव काय सांगतो..
मुंबईत ‘वीर जिजामाता’ यांच्या नावे इन्स्टिट्यूट आहे. ती ‘व्हीजेटीआय’अशी ओळखली जाते. मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले; परंतु त्याचे लघुनाम आता ‘बामू विद्यापीठ’ झाले. बाबासाहेबांच्याच नावे लोणेरेला असलेल्या टेक्निकल युनिव्हिर्सिटीचे प्रचलित नाव आता ‘बाटू युनिर्व्हिसिटी’ असे झाले आहे. कोल्हापुरातील वैद्यकीय महाविद्यालयास शाहू महाराजांचे नाव दिले आहे; परंतु त्याची ओळख शाहूंच्या नावे रूढ होऊ शकलेली नाही. ताराराणी विद्यापीठ, रयतचे शाहू कॉलेज यातून शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांची ओळख अधिक दृढ होत आहे.

अभ्यासकांनी विचार करूनच ‘शिवाजी विद्यापीठ’ असे नाव दिले आहे. बदल करण्याची मागणी चुकीची आहे. ज्यांनी ती केली आहे, त्यांना पूर्वेइतिहास सांगितल्यास त्यांचेही मतपरिवर्तन होईल. कोणत्याही राजाच्या नावाचा उल्लेख बोलताना एकेरी होतो, तरी त्यामागे भावना आदराचीच असते.
- डॉ. जयसिंगराव पवार,
ज्येष्ठ इतिहास संशोधक


मूळ हेतू नष्ट
विद्यापीठाच्या स्थापनेवेळीही विधानसभा सदस्य एस. एम. जोशी, ना. ग. गोरे आदींनी ही मागणी केली होती; परंतु तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने ‘शिवाजी विद्यापीठ’ असे नाव निश्चित केले. ‘नाव देण्याचा मूळ हेतू नष्ट होऊ नये असे वाटत असेल तर नामविस्तार करू नये’ असे लेखी पत्र कागलच्या एम. आर. चौगुले यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पाठविले आहे.

Web Title: The name of the University is as exaggerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.