‘फुले जनआरोग्य’ योजना नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:27 AM2021-05-20T04:27:02+5:302021-05-20T04:27:02+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांना काहीसे वावडे ...
राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांना काहीसे वावडे आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ रुग्णालयात एकूण बाधित रुग्णांपैकी केवळ २९३८ रुग्णांवरच (३ टक्के) या योजनेंतर्गत उपचार झाले आहेत. काही रुग्णालये जाणीवपूर्वक उपचार करण्यास टाळाटाळ करत असल्याने कर्जे काढून बिले भरण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू आहे. या योजनेतून इतर आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णालयामध्ये स्पर्धा असायची. त्याला कारणेही वेगवेगळी आहेत. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून या योजनेंतर्गत उपचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांची टाळाटाळ आहे. या योजनेपोटी शासनाकडून पॅकेज कमी मिळते. त्याचबरोबर मनमानी बिले लावता येत नसल्यामुळेच अंमलबजावणी करण्यास रुग्णालय प्रशासन नाखुश असल्याचे समजते.
एकूण कोरोनाबाधित - ९० हजार ९७१
कोरोनामुक्त - ७३ हजार ९७०
मृत्यू - ३१३९ (पैकी ३९५ जिल्हा बाहेरील)
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - १३ हजार ८६२
योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण - २९३८
कागदपत्राआधी उपचार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांमार्फत नोंदणी करता येते. रुग्णांकडे कागदपत्रे जवळ नसली तरी प्रथम उपचार सुरु करून नंतर कागदपत्रे देण्याची मुभाही शासनाने दिली आहे.
तक्रार करायची की उपचार
खासगी रुग्णालयात महात्मा फुले योजनेंतर्गत उपचार नाकारल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा समन्वयाकडे तक्रार करायची असते; मात्र कोरोना बाधिताचा रिपोर्ट हातात पडल्यानंतर रुग्णालयात बेड मिळण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू असते. शर्तीचे प्रयत्न करून बेड उपलब्ध झाल्यानंतर वेळेत उपचार व्हावेत, याकडे लक्ष असते. त्यानंतर महात्मा फुले योजनेबाबत विचारले असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे तक्रार करत बसण्यापेक्षा उपचार करून रुग्णाचा जीव वाचवण्याकडे नातेवाईकांचा कल असतो.
सामान्यांनी कोरोना झाल्यावर मरायचेच का
बेड नसल्याने सरकारी रुग्णालये दाखल करून घेत नाहीत. खासगी रुग्णालयात बेड मिळाला तर बिलाचा आकडा बघूनच डोळे पांढरे होतात. मग कोरोना झाल्यावर सामान्य माणसाने मरायचेच का? असा उद्विग्न सवाल विचारला जात आहे.
कोट-
मला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झालो. आठ दिवसात तब्बल १ लाख ७० हजार रुपये बिल भरून घेतले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.
- सर्जेराव कवडे (आवळी बुद्रुक)