संमेलनांतून नवलेखकांना ऊर्जा
By Admin | Published: November 15, 2015 11:06 PM2015-11-15T23:06:23+5:302015-11-15T23:50:32+5:30
प्रदीप पाटील : देशिंग येथे तेरावे अग्रणी साहित्य संमेलन
कवठेमहांकाळ / देशिंग : वाङ्मयीन वातावरणाच्या जागृतीसाठी आणि नव्या पिढीतील लेखक, कवींना प्रोत्साहन मिळण्यासाठी साहित्य संमेलनांची गरज आहे. अशा संमेलनांमधूनच नवसाहित्यिकांना ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन प्रा. प्रदीप पाटील यांनी केले.देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी तेराव्या अग्रणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संमेलनास आमदार सुमनताई पाटील, महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, डॉ. रणधीर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव पवार यांना ‘देशिंग भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच विटा येथील रघुराज मेटकरी यांना ‘अग्रणी साहित्य साधना’ पुरस्कार दिला, तर पणुंब्रे (ता. शिराळा) येथील वसंत पाटील यांना ‘उत्कृष्ट काव्यसंग्रह’ पुरस्कार देण्यात आला. प्रा. पाटील म्हणाले, आधीची वाङ्मयीन परंपरा आणि समकालीन वाङ्मयीन परंपरा यांच्यातील साम्य आणि निराळेपणा लक्षात येतो. समकालीन साहित्याच्या वाचनाने वर्तमान जीवनाचे वेगवेगळे स्तर समजतात. यामुळे जीवनविषयक जाणीव प्रगल्भ होते. या भूमिकेतून सहित्य संमेलनाचा विचार केला पाहिजे आणि ती घेतली पाहिजे. आमदार सुमनताई पाटील यांनी, साहित्य संमेलनात अनेक नवकवींना पे्ररणा मिळते, असे मत व्यक्त केले. ‘महांकाली’चे अध्यक्ष विजय सगरे म्हणाले, देशिंंगसारख्या भागात अग्रणी साहित्य संमेलने दरवर्षी घेतली जातात, ही अभिमानाची गोष्ट आहे.
कार्यक्रमास बांधकाम समिती सभापती गजानन कोठावळे, देशिंगचे सरपंच आप्पासाहेब कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दयासागर बन्ने, विठ्ठल पवार, संदीप माने, भरत खराडे, सुरेश सदामते यांच्यासह अग्रणी प्रतिष्ठानने केले होते. (वार्ताहर)
कवितेला स्त्री अस्मितेचे धुमारे : रणधीर शिंदे
संमेलनाच्या दुपारच्या सत्रात कविसंमेलनाध्यक्ष प्रा. रणधीर शिंंदे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. यावेळी प्रा. शिंदे म्हणाले की, समकालीन मराठी कवितेच्या विविधतेमध्ये स्त्रियांचे आवाज आपले अस्तित्व दाखवून देत आहेत. शिक्षणाचा प्रसार, काही प्रमाणात खुला झालेला सामाजिक व्यवहार, यामुळे स्त्रिया आपल्या आत्मजाणिवेचा स्वर मांडत आहेत. त्यामुळे स्त्री अस्मितेचे नवे धुमारे मराठी कवितेला फुटत आहेत. प्रारंभी कवी गो. स. चरणकर, चारूत्तासागर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते झाले. सूत्रसंचालन मनीषा पाटील़ संदीप माने यांनी केले. संमेलनास ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन, गौतमीपुत्र कांबळे, माजी सभापती सुरेखा कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘मातीविश्व’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
संमेलनामध्ये देशिंग येथील शिक्षिका, कवयित्री मनीषा पाटील यांनी लिहिलेल्या ‘मातीविश्व’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आमदार सुमनताई पाटील यांच्याहस्ते झाले.