एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात जोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:43 AM2021-02-18T04:43:47+5:302021-02-18T04:43:47+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त १५ जानेवारीची विधानसभा यादी गृहीत धरून तयार करण्यात आलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांत ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त १५ जानेवारीची विधानसभा यादी गृहीत धरून तयार करण्यात आलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांत बराच गोंधळ झाल्याची बाब बुधवारी समोर आली. आतापर्यंत केवळ सहाच तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असल्या तरी अनेक प्रभागांच्या यादीतील मतदार दुसऱ्या प्रभागांना जोडले गेल्याचे निदर्शनास आले.
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.१६) रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी महानगरपालिकेच्या गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी, ताराराणी मार्केट येथील विभागीय कार्यालयांत, ताराबाई उद्यान येथील मुख्य निवडणूक कार्यालय, तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे. यादी शुक्रवारी व शनिवारी सुटीच्या दिवशीही पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
मंगळवारी वेबसाइटवर पाहता आली नाही, तसेच विभागीय कार्यालयातही याद्या पाहण्यास गर्दी झाली नाही. मात्र, बुधवारी याद्या पाहण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात हजेरी लावली. यादी पाहण्यास वेळ लागतो. त्यामुळे यादीतील मतदारांची नावे, गल्ली, कॉलनीची नावे आहेत की नाही, हे तपासण्यास विलंब लागत आहे. तरीही बुधवारी दिवसभरात महापालिकेकडे सहा तक्रारी प्राप्त झाल्या. एका प्रभागातील नावे दुसऱ्या यादीत समाविष्ट होणे, काहींची नावेच नसणे, एक गल्लीच गायब झाली आहे. काही ठिकाणी मतदार संख्येपेक्षा कमी, तर काही ठिकाणी जास्त मतदार जोडले गेले आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत.
प्रारूप मतदार यादीवर असलेल्या हरकत, सूचना प्रभागातील संबंधित विभागीय कार्यालयाकडे कार्यरत असलेले उपशहर अभियंता तथा पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
आता पाहा प्रत्येक प्रभागात यादी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागातील नागरिकांना त्यांच्या प्रभागामध्ये प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी महापालिकेच्या वतीने आज, गुरुवारपासून उपलबध करून दिली जाणार आहे. या आधी केवळ चार विभागीय कार्यालयात त्या ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते; परंतु तेथे होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी हा निर्णय घेतला. बेवसाइटवरदेखील याद्या पाहता येतात, डाऊनलोड करून घेता येतात.