प्राथमिक आरोग्य केंद्राचे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ नामकरण; राज्यभरात नाव बदलण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 01:55 PM2024-07-09T13:55:54+5:302024-07-09T13:56:21+5:30

कोल्हापूर : देशभरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे नामकरण करून आता ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर - आरोग्य परम धनम’ असे नामकरण करण्यात ...

Naming of primary health center as Ayushyaman Arogya Mandir; The name change work is going on across the state | प्राथमिक आरोग्य केंद्राचे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ नामकरण; राज्यभरात नाव बदलण्याचे काम सुरू

प्राथमिक आरोग्य केंद्राचे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ नामकरण; राज्यभरात नाव बदलण्याचे काम सुरू

कोल्हापूर : देशभरातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे नामकरण करून आता ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर - आरोग्य परम धनम’ असे नामकरण करण्यात येत आहे. सहा महिने सर्वत्र ही नाव बदलण्याची मोहीम सुरू असून, काही राज्यात टप्प्याटप्याने हे नामकरण करण्यात येत आहे.

याआधी देशभरातील आरोग्य केंद्रे ही आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रे या नावाने ओळखली जात होती. परंतु, आता ही ओळख बदलून वरीलप्रमाणे नामकरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली यांनी २५ नोव्हेंबर २०२३च्या पत्रानुसार याबाबत सर्व राज्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डिसेंबर २३मध्ये राज्यातील विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

हे नामकरण करताना कोणता फाँट वापरायचा हेदेखील या पत्रात नमूद करण्यात आले असून, ठळकपणे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर - आरोग्य परम धनम’ असे प्रत्येक आरोग्य केंद्रावर लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्राच्या सहा बोधचिन्हांमध्ये कोणताही बदल करू नये, असेही सांगण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांचे अशा पद्धतीचे नामकरण करण्याच्या सूचना असून, सध्या महाराष्ट्रात हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. योगासह अन्य उपक्रम या ठिकाणी राबविले जाणार असल्याने याचा मंदिर असा उल्लेख केला जात असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील कार्यरत आरोग्यवर्धिनी केंद्रे

आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे : ८ हजार १२८
आरोग्यवर्धिनी प्राथमिक आराेग्य केंद्रे: १,८६१
नागरी प्राथमिक आराेग्य केंद्रे: ६०९
नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे: ३९४
आयुष्य आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे:२५४

आरोग्य केंद्राचे नाव बदलून फार फायदा होणार नाही. दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी किंवा आरोग्य मंदिर काहीही नाव ठेवले तर त्यामध्ये सेवा काय दिल्या जाणार आहेत हे महत्त्वाचे आहे. रुग्ण या ठिकाणी आल्यानंतर त्याची तब्येत चांगली व्हावी, यासाठी उपलब्ध डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय सुविधा या महत्त्वाच्या आहेत. -सचिन चव्हाण, कोल्हापूर काँग्रेस शहराध्यक्ष

Web Title: Naming of primary health center as Ayushyaman Arogya Mandir; The name change work is going on across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.