नाना जरग यांच्या सुनेचा पत्ता कट
By admin | Published: October 5, 2015 12:52 AM2015-10-05T00:52:39+5:302015-10-05T00:55:42+5:30
भाजपची उमेदवार यादी : निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना
कोल्हापूर : भाजप-ताराराणी आघाडीची अंतिम यादी रविवारी सायंकाळी जाहीर झाली. यामध्ये गेल्या २५ वर्षांपासून पक्षकार्यात असणारे भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक नाना जरग यांच्या सुनेलाच उमेदवारी डावलण्यात आली. पक्षाने येथून गीता गुरव यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नवीन आलेल्यांना उमेदवारी देऊन जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या रायगड कॉलनी-बाबा जरगनगर (प्रभाग क्र. ७८) येथून भाजप-ताराराणी आघाडीकडून भाजपचे माजी नगरसेवक व माजी महानगर जिल्हाध्यक्ष नाना जरग यांनी आपल्या भावाची सून वैशाली संजय जरग यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. रितसर मुलाखतही दिली होती.
यावेळी पक्षाच्या नेत्यांकडून तिकीट तुम्हालाच, अशी हमी देण्यात आली होती. परंतु, रविवारी अचानक उमेदवारी यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले. नाना जरग हे गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ पक्षाशी एकनिष्ट राहून कार्यरत आहेत. त्यांनी महानगर जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, अशी पदे भूषविली असून, सध्या ते पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय त्यांच्यासह त्यांच्या सुनेनेही जरगनगर प्रभागात नगरसेवक म्हणून दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. असे असताना उमेदवारी डावलल्याने धक्का बसला आहे.
उमेदवारी डावलण्यामागील कारणही स्पष्ट करण्यात आलेले नाही. उलट भाजप व ताराराणी आघाडीकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. त्याचबरोबर शेजारी प्रभागात जरग यांनी सांगितलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे. परंतु, त्यांना मात्र उमेदवारी मिळू शकली नाही. यामुळे नेमके पक्षात काय सुरू आहे? असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे. तिकीट वाटपात आर्थिक देवाण-घेवाण सुरू असल्याचीही चर्चा कार्यकर्त्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
मी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ भाजपचे काम करत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली आहे. असे असतानाही उमेदवारी डावलण्यात आली. ती का डावलली? याचे कारणही स्पष्ट करण्यात आले नाही. आपले कुणाशीही वैरत्व नाही. आपण स्वत:साठी तिकीट मागितले नव्हते. रायगड कॉलनी-जरगनगर व रामानंदनगर-जरगनगर प्रभागातून पक्षाच्या दोन जागा निवडून आणण्याची ग्वाही आपण दिली होती. त्याचबरोबर पक्षाच्या नेत्यांनीही तुमचे तिकीट फायनल असल्याचे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात तसे झाले नाही. जुन्या कार्यकर्त्याला डावलून नवीन आलेल्यांना उमेदवारी का दिली? हे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
- नाना जरग, माजी नगरसेवक, भाजप