ब्रिटिशकालीन थाट जपणारे नानासाहेब बांदिवडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:58 PM2019-04-28T23:58:55+5:302019-04-28T23:58:59+5:30
नितीन भगवान देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक पन्हाळ्याच्या मातीतील मनोहर दत्तात्रय बांदिवडेकर ऊर्फ नानासाहेब बांदिवडेकर ऊर्फ नानासाहेब शंभरीत ...
नितीन भगवान
देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक पन्हाळ्याच्या मातीतील मनोहर दत्तात्रय बांदिवडेकर ऊर्फ नानासाहेब बांदिवडेकर ऊर्फ नानासाहेब शंभरीत प्रवेश करीत आहेत.
दोन माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत असणाऱ्या नानासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि नंतरचा पोलीस प्रशासनाचाही प्रदीर्घ काळ अनुभव घेतला आहे. नानासाहेब तेव्हाही कडक कपडे आणि सुटाबुटात वावरत होते आणि आजही ते तेवढ्याच रुबाबात वावरतात. बदलत्या परिस्थितीनुसार वयाच्या शंभरीत प्रवेश करीत असतानाही ते नवतरुणाच्याच उत्साहात लॅपटॉप आणि स्मार्टफोनचा वापर करतात. दृष्टी थोडीशी मंदावली असली तरी ताठपणे चालण्याचा सराव अजूनही कायम आहे.
कोल्हापूर स्टेट असताना १९४३ मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. संस्थानकाळातील आणि स्वातंत्र्यानंतरही पोलीस खात्यात काम केलेले नानासाहेब हे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव पोलीस अधिकारी आहेत. पदवी मिळाल्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांची नेमणूक केली होती. १५ आॅगस्ट १९४७ रोजी ते गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होते. स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या ध्वजारोहण समारंभात त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्याचा सन्मान त्यांना लाभला होता. तेव्हा राष्ट्रीय ध्वजाला त्यांनी सर्वप्रथम सलामी दिली. या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गडहिंग्लजच्या सर्वच नागरिकांशी त्यांनी प्रत्यक्ष हस्तांदोलन करून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. गेल्या २० वर्र्षांपासून ते पन्हाळा येथील सज्जा कोठी येथे होणाºया ध्वजारोहणाच्या सर्व समारंभांना आवर्जून हजेरी लावतात. गतवर्षीपासून ते दिल्लीत वास्तव्य करतात. तेथील ध्वजारोहण समारंभही त्यांच्याच हस्ते झाला.
त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी शिवभूमी पन्हाळगडावर झाला. त्यांचे शालेय शिक्षण पन्हाळा आणि सातारा येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात झाले. या शिक्षणाबरोबर त्यांनी कायद्याचीही पदवी घेतली. १०० वर्षांच्या काळात त्यांनी १९४३ पासून म्हणजेच संस्थानकाळापासून स्वातंत्र्यानंतर ३४ वर्षे पोलीस खात्यात सेवा बजावली. १९७७ मध्ये ते पोलीस उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले.
पोलीस खात्यात काम करीत असताना वाळवा तालुक्यातील रेठरे (जि. सांगली) येथील विशेष गुन्ह्याचा उलगडा त्यांनी केला होता. पोलीस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर ते रेठरे साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून १२ वर्षे काम पाहत होते. त्यानंतर दोन वर्षे ते पन्हाळा बालग्रामचे अध्यक्ष होते.
त्यांना सहा अपत्ये आहेत. पाच मुली आणि एक मुलगा उच्चशिक्षित असून ते परदेशी वास्तव्यास
आहेत. २००५ मध्ये त्यांच्या पत्नीने जगाचा निरोप घेतल्यानंतर नाना आयुष्याच्या प्रवासात एकाकी झाले. मात्र, खिलाडूवृत्तीने ते या कठीण प्रसंगातून बाहेर पडून वेगवेगळ्या विषयांत रस घेतात.
पन्हाळगडावर राहत असतानाही केखले गावातील शिवजयंती त्यांच्याशिवाय साजरी होत नाही. एकदा ते तेथील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गेले, तेव्हापासून आजतागायत ते केखले गावातील शिवजयंती साजरी करतात. सध्या त्यांचे वास्तव्य दिल्लीत मुलीकडे असते. या वास्तव्यात त्यांनी वाचनाचीही आवड जोपासली आहे. ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीचा अंक त्यांनी आवर्जून सुरू केला आहे.
पोलीस खात्यात काम करीत असताना नानासाहेबांना देशाच्या दोन पंतप्रधानांची सेवा करण्याची संधी मिळाली होती. ‘हा माझा बहुमान होता,’ असे ते आजही सांगतात. रत्नागिरीत सेवेत असताना पंडित जवाहरलाल नेहरू आणि नाशिक येथे सेवेत असताना लालबहादूर शास्त्री यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ते होते. या दोघांच्याही हस्ते त्यांना विशेष प्राविण्याचे प्रशस्तिपत्र मिळाले आहे. प्रवासाची आवड असल्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी संपूर्ण भारतभ्रमंती केली आहे. शिवाय परदेश पर्यटनही केले आहे.
नाना बांदिवडेकर यांचा गेल्या वर्षी ‘सर्वांत
ज्येष्ठ पोलीस अधिकारी’ म्हणून पन्हाळा पोलिसांनी सत्कारही केला आहे. याशिवाय ‘पन्हाळा भूषण’, ‘सीनिअर सिटीझन’ असे पुरस्कारही त्यांनी मिळविलेले आहेत.
पन्हाळ्याविषयी ‘माझा गाव’ असे अभिमानाने सांगताना नानासाहेब म्हणतात की, पन्हाळ्यावर सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण असून, पूर्वीचा निसर्गाने बहरलेला पन्हाळा हरवला आहे. तो जपा, इतकेच माझे म्हणणे आहे. शंभरीत प्रवेश करताना आपल्या आरोग्याचे रहस्य त्यांनी थोड्याच शब्दांत सांगितले, ‘कमी खा... भरपूर पाणी प्या... आणि जास्त चाला...!’