नंदवाळ नगरी, अवतरली पंढरी ! : ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:00 AM2018-07-24T01:00:00+5:302018-07-24T01:01:46+5:30
सडोली (खालसा) : माउली.., माउली.., विठोबा रखुमाई.., ज्ञानबा-तुकारामांचा मुखी अखंड जयघोष, हाती भगवी पताका, टाळ-मृदंगाचा गजर करीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांबरोबर आबालवृद्धांसह प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाºया नंदवाळ (ता. करवीर) येथे आषाढी एकादशी यात्रेसाठी लाखो वैष्णवांचा मेळा जमला होता. पुईखडी येथील अश्वरिंगण सोहळा पार पडल्यानंतर नंदवाळ (ता. करवीर) येथे भक्तीचा महासागर उसळला. विठूरायाच्या गजरात व अपूर्व भक्तिमय वातावरणात नंदवाळ येथील आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला.
नंदवाळ गावी दरवर्षी आषाढी एकादशीला करवीर, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील दिंड्यांसह सांगली, सातारा, कोकण आणि कर्नाटक भागातून भाविक विठूरायाचे ‘याची देही याची डोळा’ रूप पाहण्यासाठी दाखल होत असतात. यावर्षीही विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोमवारी पहाटे चार वाजल्यापासूनच अलोट गर्दीने भाविक दाखल झाले होते.
सोमवारी आषाढी एकादशीच्या पहाटे अडीच वाजता विठ्ठल मंदिरात विठूराया, माता रुक्मिणी व सत्यभामा देवीच्या मूर्तीची करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी तेजस्विनी सूर्यवंशी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त विश्वास फाटक, पंचायत समिती सदस्य अश्विनी धोत्रे, सरपंच अस्मिता कांबळे, कृष्णात पाटील, उपसरपंच सागर पाटील, जोतीराम पाटील, ग्रामसेवक अमिता निळकंठ, तानाजी निकम, भीमराव पाटील, देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यानंतर काकड आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंडपात सोडण्यात आले.
दरम्यान, कोल्हापूरहून सकाळी ८ वाजता निघालेला पायी दिंडी सोहळा चांदीच्या पालखीसह दुपारी बारा वाजता पुईखडी येथे दाखल झाला. येथे अश्व पूजन महापौर शोभा बोंद्रे व करवीर पंचायत समितीच्या सदस्या आश्विनी धोत्रे यांच्या हस्ते झाले. पालखी पूजन आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी अश्वरिंगण सोहळा पार पडला. यावेळी नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, जि. प. सदस्य राहुल पाटील, कृष्णात धोत्रे, सरदार पाटील आदी उपस्थित होते.
पहाटेपासूनच लांबलचक रांगा
नंदवाळ येथील प्राचीन हेमाडपंथी विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठलाचे वास्तव्य असते, अशी श्रद्धा असल्याने दरवर्षी दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या गर्दीत वाढ होत असून यावर्षी सुमारे ५ लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याचे भक्त मंडळाकडून सांगण्यात आले. रविवारी दुपारी चार वाजल्यापासूनच भाविकांचा ओघ नंदवाळमध्ये येण्यास सुरुवात झाला होता. तसेच सोमवारी पहाटे दोन वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत लांबलचक रांगा मंदिराबाहेर लागल्या होत्या.
नंदवाळमध्ये पहाटेपासून सुरू असलेली भाविकांची रीघ मध्यरात्रीपर्यंत.
मंदिराबाहेर चार ते आठ तास दर्शनासाठी भाविक रांगेत.
वाशी येथे रिंगण पार पडल्यावर महिलांचा झिम्मा-फुगडीचा फेर.
विविध संघटनांतर्फे फराळ वाटप, तसेच भाविकांना मोफत आरोग्य सुविधा.
वृक्षमित्र सुभाष पाटील यांच्याकडून भाविकांना मोफत वृक्ष वाटप.
आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या नंदवाळ (ता. करवीर) येथे कोल्हापुरातून निघालेल्या पायी दिंडीचे पुईखडी येथे उभे रिंगण पार पडले. यावेळी धावणाºया माउलींच्या अश्वाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या दिंडीत हा बाल विठ्ठल आपल्या पित्याच्या खांद्यावर बसून वारकºयांना साथ देत होता.